खाद्यतेलाचा वारंवार वापर हा तर गुन्हा, होऊ शकतो कँन्सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:20 AM2021-09-26T04:20:12+5:302021-09-26T04:20:12+5:30
पावसाळ्याच्या दिवसात व एरव्ही सुध्दा प्रत्येकाला चमचमीत पदार्थ खाण्याचा मोह आवरत नाही. शहरातील तरुण, तरुणी यांच्यासह सर्वच वयोगटातील नागरिकांना ...
पावसाळ्याच्या दिवसात व एरव्ही सुध्दा प्रत्येकाला चमचमीत पदार्थ खाण्याचा मोह आवरत नाही. शहरातील तरुण, तरुणी यांच्यासह सर्वच वयोगटातील नागरिकांना भेळ, पाणीपूरी, रगडा, दाबेली, वडापाव यासह मिसळ आणि चायनिझ व फास्टफूड खाण्यासाठी अनेक ठिकाणी खवय्यांची दररोज गर्दी होते. हाँटेल तसेच रस्त्यावर खाद्यपदार्थ बनविताना अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. शहरात वसमत रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, शिवाजी चौक रस्ता, शनिवार बाजार परिसर यासह जिंतूर रोड आणि अन्य अनेक भागात रस्त्यावर तयार करुन तसेच बनविलेले खाद्यपदार्थ विक्री केले जातात. मात्र, ते बनविताना वापरले जाणारे तेल, भाजी, मसाला यासह अन्य बाबींकडे खाणारे दुर्लक्ष करतात. परिणामी, यातून आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे, असा सल्ला डाँक्टरांकडून दिला जातो.
अहो आश्चर्यम, एकावरही कारवाई नाही
अन्न व औषध प्रशासनाकडून रस्त्यावर खाद्यपदार्थ बनविणाऱ्यांची कधी तपासणी झाली, असे दिसून येत नाही. यासह हाँटेल व स्वीट मार्ट आणि फास्टफूड सेंटरवरही कधी तपासणी मोहिम राबविली जात नाही. याबाबत नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.
तर होईल गुन्हा दाखल...
रिफाइंड तेल तसेच शुध्द तेल जरी वापरले जात असले तरी त्याचा एकदा वापर झाल्यावर पुन्हा ते वापरु नये. अशा प्रकारे तेल पुन्हा वापरल्यास नागरिक तसेच ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण
होऊ शकतो. यात दोषी आढळल्यास गुन्हाही दाखल होऊ शकतो.
रस्त्यावर न खाल्लेले बरे
शहरात जवळपास ८ ते १० ठिकाणी खाद्यपदार्थ बनविणारे हातगाडे थांबतात. या ठिकाणाची स्वच्छता तसेच तयार पदार्थ बनविताना कोणती काळजी घेतली जाते. हे तपासलेले बरे. पावसाळ्यात साथीचे आजार तळलेले पदार्थ खाणे तसेच बाहेरील पाणी पिणे यामुळे होऊ शकतात. ही बाब लक्षात घेता रस्त्यावर न खाल्लेले बरे.
तेलाचा पुर्नवापर आरोग्याला घातक
घरी खाद्यपदार्थ बनविताना तळलेले तेल पुन्हा शक्यतो महिला वापरत नाहीत. यामागे काही कारणे आहेत. तेलातील पोषण मुल्य एकदा वापर केल्यावर निघून जातात. यामुळे त्याचा पुन्हा वापर केल्यास ते आरोग्यास हितकारक नसते. मात्र, दरवेळी नवीन तेल वापरणे ही बाब आर्थिकदृष्या परवडणारी नसल्याचे सांगून अनेक विक्रेते त्याच तेलाचा पुर्नवापर करतात.
डाँक्टरांचा सल्ला
एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरु नये. त्यातील पोषण मुल्य कमी होते. यातून पचनाच्या तसेच श्वसनाच्या समस्या उदभवू शकतात. व पुन्हा त्याच तेलाचा वापर केल्यास आणि नेहमी बाहेरील खाद्यपदार्थ खाल्यास कँन्सरसारखे आजार होण्याची भिती असते. डाँ. अनिल रामपूरकर, आर्युवेदिक तज्ञ.