परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेंशन वाढीच्या मागणीसाठी २१ जेष्ट नागरिकांनी केले मुंडन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 02:47 PM2018-06-22T14:47:02+5:302018-06-22T14:47:02+5:30
मासिक पेंशन ७५०० रुपये व महागाई भत्ता त्वरित लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय ई.पी.एस.१९९५ संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरु आहे.
परभणी : मासिक पेंशन ७५०० रुपये व महागाई भत्ता त्वरित लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय ई.पी.एस.१९९५ संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरु आहे. यावेळी २१ जेष्ट नागरिकांनी मुंडन करुन मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली.
३१ मे २०१७ ला ई. पी.एफ.ओने काढलेले परिपत्रक रद्द करुन सुप्रिम कोर्टाच्या निकालाप्रमाणे पूर्ण पगारावर पेंशन निवडीची संधी देण्यात यावी, पेंशन मिळत नसलेल्या निवृत्त कामगारांना ईपीएस १९९५ च्या योजनेत सामील करुन पेंशन लागू करावे या मागण्या मान्य होईपर्यंत मा.खा.भगतसिंग कोशियारी यांच्या अहवालानुसार ५ हजार रुपये प्रमाणे पेंशन व महागाई भत्ता लागू करावा आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय ईपीएस १९९५ संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने व म्हणणे मांडून पाठपुरावा करण्यात आला. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज सकाळी ११ वाजता ई.पी.एस.१९९५ चे संघर्ष समितीचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या मैदानात जमा झाले. त्यानंतर एक दिवसीय लाक्षणीक उपोषण सुरु केले.
उपोषणा दरम्यान दुपारी दीड वाजता २१ जणांनी आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी मुंडन करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनात डी.पी.बेंडे, पी.डी.चामणीकर, अनंतकुमार पेडगावकर, यादव पतंगे, जी.आर.चोढे, टी.जी.आवटे, एम.पी.सिराळे, एस.टी.जाधव, व्ही.आर.काळे, अप्पाराव देशमुख, पी.आर. देशमुख, हेमंत जोशी यांचा सहभाग होता. आंदोलनानंतर संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.