परभणीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा बेरोजगारांच्या प्रश्नांवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:36 AM2018-03-28T00:36:35+5:302018-03-28T10:47:19+5:30
देशात बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असून या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात केंद्र शासन अपयशी ठरल्यावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : देशात बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असून या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात केंद्र शासन अपयशी ठरल्यावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला.
केंद्र शासनाने निवडणुकीपूर्वी २ कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु, नोकऱ्या तर मिळाल्या नाहीत. शिवाय नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशातील उद्योगधंदे बंद पडले. अभियंत्यापासून ते कामगारांपर्यंतच्या नोकरदारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली. कौशल्य विकास योजनेच्या राज्यामध्ये ७ हजार २५२ प्रशिक्षण संस्था आहेत. परंतु, या संस्थांना शासनाने पैसा दिला नाही. त्यामुळे या संस्था बंद पडल्या व ५५ हजार कर्मचारी बेरोजगार झाले. त्यामुळे रोजगार मागणारा, रोजगार देणारा आणि रोजगारासाठी प्रशिक्षण देणारा अशा सर्वांवरच बेरोजगारीचे संकट कोसळले असून शासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, आदी मागण्यांसाठी रायुकाँने मंगळवारी दुपारी २ वाजता विसावा चौक येथून जिल्हा कचेरीपर्यंत मोर्चा काढला. जिल्हा कचेरीसमोर मोर्चा आल्यानंतर जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, उपाध्यक्ष संतोष मुंडे, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष शांतीस्वरुप जाधव, किरण तळेकर, प्रा.किरण सोनटक्के, मारोती बनसोडे, पंकज आंबेगावकर, तानाजी कदम, खालीद शेख, सुदर्शन काळे, शेख इम्तियाज, बाळा देशमुख, गोविंद गोळेगावकर, गजानन घाडगे, गजानन वैद्य आदींची उपस्थिती होती.