परभणी : साई जन्मभूमीच्या आराखड्यासंदर्भात राजभवनात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 01:01 AM2018-01-13T01:01:48+5:302018-01-13T01:03:56+5:30
येथील साई जन्मभूमीच्या विकासासंदर्भात तयार केलेल्या १०० कोटी रुपयांच्या आराखड्यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत १३ जानेवारी रोजी मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे़ राष्ट्रपतींनी आ़ बाबाजानी दुर्राणी यांच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ दिला असून, साई जन्मभूमीच्या विकासाला यामुळे चालना मिळणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी : येथील साई जन्मभूमीच्या विकासासंदर्भात तयार केलेल्या १०० कोटी रुपयांच्या आराखड्यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत १३ जानेवारी रोजी मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे़ राष्ट्रपतींनी आ़ बाबाजानी दुर्राणी यांच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ दिला असून, साई जन्मभूमीच्या विकासाला यामुळे चालना मिळणार आहे़
बिहारचे राज्यपाल असताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाथरी येथील साई मंदिराला भेट दिली होती़ त्यावेळी पाथरी नगरपालिका प्रशासनाला त्यांनी विकासाचा आराखडा तयार करण्याचे सुचविले होते़ त्यानंतर पाथरी पालिकेने १०० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला़ त्याचप्रमाणे मानवत रोड ते पाथरी हा रेल्वेमार्गही प्रस्तावित झाला आहे़ या पार्श्वभूमीवर पाथरी नगरपालिकेने जन्मभूमीच्या विकासासाठी तयार केलेला १०० कोटींचा आराखडा राज्य शासनाला सादर केला होता़ यासंदर्भाने आ़ बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राष्ट्रपतींकडे चर्चेसाठी वेळ मागितला होता़ त्यावर राष्ट्रपतींनी १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई येथील राजभवनात चर्चेसाठी बोलावले असून, यावेळी विकास आराखडा आणि रेल्वे मार्गाच्या प्रश्नावर चर्चा होणार आहे़, अशी माहिती आ़ दुर्राणी यांनी पाथरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली़ या शिष्टमंडळात साई संस्थानचे संजय भुसारी, प्रकाश सामंत, बालाप्रसाद मुंदडा, अॅड़ अतुल चौधरी यांनाही आमंत्रित केले आहे़ पाथरी हे साईबाबांची जन्मभूमी असून, १७ वर्षांपूर्वी या ठिकाणी प्रती शिर्डी साई मंदिराची स्थापना करण्यात आली आहे़ मात्र या जन्मभूमीचा विकास झाला नाही़ शासनाने तीर्थक्षेत्र विकासासाठी या मंदिराची निवड केली असली तरी मोठा निधी प्राप्त झालेला नाही़ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंदिराच्या विकासासंदर्भात चर्चेसाठी वेळ दिल्याने येथील विकास कामांना चालना मिळेल, अशी आशा आहे़