परभणी जिल्हा नियोजन समितीचा निधी: आरोग्य केंद्र बांधकामासाठी ७ कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:32 AM2017-12-20T00:32:17+5:302017-12-20T00:32:24+5:30
जिल्ह्यातील १९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवीन धर्मशाळा बांधकाम व ३ आरोग्य उपकेंद्रांच्या इमारत बांधकामासाठी एकूण ६ कोटी ९० लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केला असून सदरील निधीची रक्कम जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील १९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवीन धर्मशाळा बांधकाम व ३ आरोग्य उपकेंद्रांच्या इमारत बांधकामासाठी एकूण ६ कोटी ९० लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केला असून सदरील निधीची रक्कम जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम व विस्तारीकरण या योजनेअंतर्गत येलदरी, पाथरगव्हाण, आसेगाव, कोद्री, कावलगाव, पेडगाव, वाघाळा, वालूर, आडगाव, देऊळगाव गात, पिंपळदरी, सोनपेठ या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नवीन धर्मशाळा बांधण्यासाठी प्रत्येकी ८ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच येलदरी, हादगाव, आसेगाव, देऊळगाव गात येथे नवीन औषधी भांडार केंद्र उभारण्यासाठी प्रत्येकी ६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
धानोरा काळे येथील औषधी भांडारासाठी ११ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच कौसडी आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारत बांधकामासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून हादगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत विस्तारीकरणासाठी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रांच्या इमारतीचे बांधकाम व विस्तारीकरणाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे.
तीन उपकेंद्रांसाठी
२ कोटी ४० लाख
४पाथरी तालुक्यातील देवनांद्रा, कोथाळा व रामपुरी खु. या तीन प्राथमिक उपकेंद्रांच्या नवीन इमारती बांधण्यासाठी प्रत्येकी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कोथाळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करुन त्याला निधी उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे जि.प.सदस्य विष्णू मांडे यांनी पाठपुरावा केला. याबाबत त्यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेतही विषय उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांच्या मागणीची दखल घेत, यासाठीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर केला होता. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.
१९ आरोग्य केंद्रांची होणार दुरुस्ती
४जिल्ह्यातील १९ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी ५२ लाख ५३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये हादगाव, मरडसगाव, कसर, हरंगुळ, चुडावा, पेडगाव, लिंबा, लिमला, पिंपळदरी, खडका, फुलकळस, केकरजवळा या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी प्रत्येकी ३ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर भोसी आरोग्य उपकेंद्रासाठी ४ लाख रुपये आणि झरी, सावंगी, कोक, वझर बु. येथील आरोग्य केंद्रांसाठी प्रत्येकी २ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पिंपळगाव गायके येथील आरोग्य उपकेंद्रासाठी अडीच लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.