रस्ते दुरुस्तीसाठी पावणेचार कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:17 AM2021-04-27T04:17:59+5:302021-04-27T04:17:59+5:30
गतवर्षी अवकाळी पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांबरोबरच रस्ते व पुलांचे मोठ्या प्रमाणात ...
गतवर्षी अवकाळी पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांबरोबरच रस्ते व पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती. या अनुषंगाने शासनाकडे जिल्हास्तरावरून निधीची मागणी करण्यात आली होती. याअंतर्गत जिल्ह्याला २ कामांसाठी निधी देण्यात आला आहे. त्यामध्ये सेलू तालुक्यातील मोरेगाव, हातनूर, वालूर, कौसडी, बोरी, वस्सा या रस्त्याच्या कामासाठी १ कोटी ९५ लाख ७७ हजार ३९९ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच जिंतूर तालुक्यातील जिल्हा हद्द ते वाडी घागरा-कावी-दहेगाव या कामासाठी १ कोटी ८४ लाख ५२ हजार ५७९ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या दोन्ही कामांच्या निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने काढल्या आहेत. त्यानुसार २६ एप्रिलपर्यंत यासाठी निविदा दाखल करावयाच्या होत्या. सोमवारपर्यंत निविदा दाखल झाल्यानंतर त्यांची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रशासकीय प्रक्रियेनुसार प्रत्यक्ष या कामांना सुरुवात होणार आहे.
दरम्यान, या कामांसाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार हा निधी देण्यात आला असल्याची माहिती जिंतूरच्या आ. मेघना बोर्डीकर यांनी दिली.