परभणी जिल्ह्यातील गाव रस्त्यांचा निधी अडकला मंत्रालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 08:14 PM2018-06-14T20:14:03+5:302018-06-14T20:14:03+5:30

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यातील २० गाव रस्त्यांचे मोठ्या थाटामाटात ई भूमीपूजन करण्यात आले खरे; परंतु, प्रत्यक्षात निधी वितरित झाला नसल्याने जिल्ह्यातून पाठविलेले रस्त्यांचे प्रस्ताव मंत्रालयात अडकले आहेत़

Funds of village roads in Parbhani district are funded by the Adkal Mantralaya | परभणी जिल्ह्यातील गाव रस्त्यांचा निधी अडकला मंत्रालयात

परभणी जिल्ह्यातील गाव रस्त्यांचा निधी अडकला मंत्रालयात

Next

- मारोती जुंबडे

परभणी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यातील २० गाव रस्त्यांचे मोठ्या थाटामाटात ई भूमीपूजन करण्यात आले खरे; परंतु, प्रत्यक्षात निधी वितरित झाला नसल्याने जिल्ह्यातून पाठविलेले रस्त्यांचे प्रस्ताव मंत्रालयात अडकले आहेत़ त्यामुळे गावकऱ्यांना आता थेट मुख्यमंत्र्यांच्या कक्षातून या प्रस्तावांना कधी मंजुरी मिळते याचीच प्रतीक्षा लागली आहे़ सध्या तरी खड्डे आणि चिखलमय रस्ते कायम असल्याने शासनाच्या निधी वितरणाच्या घोषणा हवेत विरल्याची भावना निर्माण झाली आहे़

परभणी जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांसह राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग अशा सुमारे ५ हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचे ई भूमीपूजन १९ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाले़ या कार्यक्रमात जिल्ह्याला दिलेल्या निधीचे आकडे ऐकूण जिल्हावासियांचे डोळे फिरण्याची वेळ आली होती़ एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिल्याच्या घोषणा करण्यात आल्या; परंतु, प्रत्यक्षात काम सुरू होण्याच्या नावाने मात्र बोंब असल्याचे दिसत आहे़ जिल्ह्यात काही भागात राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू असली तरी ग्रामीण रस्त्यांची कामे मात्र प्रशासकीय सोपस्कारातून अद्यापही बाहेर पडली नाहीत़ त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी जी स्थिती होती ती आजही कायम असून, आगामी काळात या रस्त्यांची दैना आणखी वाढणार आहे़

एप्रिल महिन्यात परभणी येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २० रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योनजेंतर्गत मंजुरी देण्यात आली़ ७१ कोटी २९ लाख रुपये खर्चाचे हे रस्ते मंजूर केल्याने येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू होईल, अशी जिल्हावासियांची अपेक्षा होती़
वर्षानुवर्षापासून खड्डे आणि चिखलामधून तालुका, जिल्ह्याचे ठिकाण गाठणाऱ्या ग्रामस्थांना रस्त्याच्या मंजुरीमुळे आनंद झाला़ मात्र हा आनंद क्षणिक ठरला आहे. अजूनही रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्ष मंजुरीच मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे़ राज्य शासनाने ग्रामीण रस्त्यांसाठी ७१ कोटी २९ लाख रुपये मंजूर करून गावनिहाय रस्त्यांचे ई भूमीपूजनही करण्यात आले़

२० ग्रामीण रस्त्यांना नोव्हेंबर २०१७ आणि जानेवारी २०१८ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली आहे़ सात महिन्यांपासून प्रशासकीय मान्यता मिळालेल्या रस्त्यांची कामे अजूनही प्रत्यक्षात सुरू झाली नाहीत़ त्यामुळे ही कामे अडकली कुठे? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्थानिकस्तरावर या रस्त्यांच्या निविदा निघाल्या आहेत़ कार्यारंभ आदेशही दिले आहेत़

लवकरच कामे सुरू होतील, अशी मोघम प्रशासकीय उत्तरे देण्यात आली़ मात्र नेमकी कामे अडली कुठे? याचा शोध घेण्यासाठी आणखी खोलात गेल्यानंतर या कामांना मंत्रालयातूनच मंजुरी नसल्याचे समोर आले आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या औरंगाबाद येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले़ या रस्त्याच्या निविदा पूर्ण झाल्या आहेत़ प्रत्येक रस्त्याच्या कामासाठी लागणारा खर्चाचा आराखडाही काढला आहे आणि या फाईली आता मंजुरीसाठी मंत्रालयात पाठविल्या आहेत़ त्यामुळे मंत्रालयातून जेव्हा मंजुरी होऊन या फाईली आमच्याकडे येतील़ त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल़

कमी किंमतीच्या निविदा मंजूर करून  प्रत्यक्ष त्या कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश दिले जातील आणि त्यानंतर  कुठे रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल, असे सांगण्यात आले़ त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या घोषणा आणि दिलेली आश्वासने सध्या तरी जिल्हावासियांसाठी केवळ आकड्यांचा खेळ असल्याचेच दिसत आहे़ मंत्रालय स्तरावर निधी वितरण कधी होते, याकडे आता संपुर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
या २० कामांचे झाले आहे

उद्घाटन मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यात २० रस्त्यांच्या कामाचे ई भूमीपूजन झाले आहे़ त्यात सावळी ते किन्होळा (६़३४), शिर्शी ते खडका (५ ़५७), हादगाव-नाथ्रा (६़३२), टाकळी कुंभकर्ण-आर्वी-शहापूर (३़५२), आनंदवाडी रस्ता (१़१०), एकरुखा रस्ता (०़६२), राज्यमार्ग ते वांगी (०़९३), राष्ट्रीय मार्ग ते झरी-मिर्झापूर (२़६९), अरबूजवाडी ते लिंबेवाडी (४़१३), खादगाव-हरंगुळ (३़९९), वागलगाव रस्ता (०़६९), कावलगाव ते धानोरा मोत्या (५़७६), आहेरवाडी रस्ता (२़३२), मांगणगाव ते साडेगाव (४़९८), सायाळा-परळगाव (२़९५), वागदेवाडी (३़०२), खोकलेवाडी रस्ता (१़१६), बाभुळगाव ते फुलारवाडी (४़१०) आणि पेडगाव ते इस्माईलपूर-सारंगपूर रस्ता (५़७१) या रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे़ कंसातील आकडे रस्ता कामासाठी मंजूर निधीचे (कोटीमध्ये) आहेत़

आणखी चार महिन्यांची निश्चिंती
उन्हाळ्यामध्ये रस्त्यांची कामे केली जातात़ त्यानुसारच एप्रिल महिन्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २० रस्त्यांच्या कामांचे ई भूमिपूजनही करण्यात आले होते. ही कामे मे आणि जून या दोन महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते़ आता पावसाळा सुरू झाला असून, पावसाळ्यामध्ये शक्य तो रस्त्याची कामे हाती घेतली जात नाहीत़ त्यामुळे परभणी जिल्ह्यातील नागरिकांना पावसाळा संपण्याची वाट पहावी लागणार आह़े  परिणामी आणखी किमान चार महिने तरी रस्त्याच्या कामांना सुरुवात होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही़ यामुळे या भागातील रस्त्यांची आणखी दैना होणार आहे़

७१ कोटींच्या रस्त्यांचे नियोजन
परभणी जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २० रस्ते मंजूर करण्यात आले आहेत़ त्यासाठी मान्यताही देण्यात आली आहे़ ७१ कोटी ३० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत़ त्यामुळे या निधीतून जिल्ह्यातील रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे़
घोषणा झाल्या, परंतु निधी नाही जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निधीची घोषणा करण्यात आली़ या घोषणांवरच रस्ते तयार करण्याचे आराखडे तयार करण्यात आले़ हे आराखडे मंत्रालयातही पाठविण्यात आले़ परंतु, प्रत्यक्षात रस्त्यांच्या कामांसाठी निधीची अलॉटमेंट झाली नाही़ त्यामुळे ही सर्व कामे मंत्रालयातील दप्तर दिरंगाईत अडकून पडली आहेत़ या रस्त्याच्या कामासाठी स्थानिक स्तरावरून लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा कमी पडत आहे़ त्यामुळे जोपर्यंत ओरड होणार नाही, तोपर्यंत मंत्रालयातील या फाईली हालणार नाहीत आणि परभणीकरांची प्रतीक्षाही संपणार नाही, अशीच एकंदर परिस्थिती निर्माण झाली आहे़

Web Title: Funds of village roads in Parbhani district are funded by the Adkal Mantralaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.