गोदा पात्र कोरडे पडले अन् उघड झाला पुरातन ठेवा; ११ व्या शतकातील मुर्ती, शिलालेख सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 01:09 PM2023-03-11T13:09:33+5:302023-03-11T13:09:54+5:30
या प्राचिन दगडी शिल्पाचा ठेवा जतन करण्यासाठी पुरातन विभागाने पुढाकार घेण्यात यावा अशी मागणी पुढे आली.
- अनिल शेटे
गंगाखेड - नृसिंह घाटाजवळ गोदावरी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. या पात्रालगत शुक्रवारी ( दि.३) ११ व्या शतकातील लक्ष्मी नारायणाची मुर्ती आणि शिलालेख सापडले आहेत. त्यामुळे शहराला पुरातन ठेवा असल्याचे पुरावे पुढे आले आहेत.
गोदावरी नदी घाटावर पुरातन नृसिंह मंदिर आहे. या नृसिंह मंदिर परिसरातील गोदावरी पात्रालगत व पात्रात अकराव्या शतकातील अंखड दगडात कोरीव व नक्षी काम केलेली लक्ष्मी नारायण मुर्ती, शिलालेख आणि भारवाहक, सती शिळ, नागशिल्प, नंदी असे अनेक दगडी कोरीव शिल्प आढळले. यातील काही शिल्प भग्नावस्थेत आहेत. या प्राचिन दगडी शिल्पाचा ठेवा जतन करण्यासाठी पुरातन विभागाने पुढाकार घेण्यात यावा अशी मागणी पुढे आली.
परभणी जिल्हातील ऐतिहासिक वारसा कमिटीच्या वतीने इतिहास संशोधक प्रा.अविनाश खोकले व छायाचित्रण करण्यासाठी आलेले संदिप देऊळगावकर यांनी हेमाडपंथी मंदिर असलेल्या अंधारा महादेव, लक्ष्मीनारायण मंदिर , चिंतामणी मंदिर याची माहिती आणी छायाचित्रण घेऊन गोदावरी नदी येथिल नृसिंह मंदिराचे व परीसरातील छायाचित्रण घेण्यासाठी आले होते. दरम्यान, गोदावरी पात्रालगत ऐतिहासिक खुणा असलेल्या भग्न अवस्थेतील दगडी शिल्प आढळले. लक्ष्मीनारायणाची अलंकृत कोरीव मुर्ती दिसून आली. प्राचीन इतिहासाची साक्ष असलेला मात्र दुर्लक्षीत ठेवा नृसिंह मंदिर जवळ सापडला.