जुगाऱ्यांचा सेलू पॅटर्न; सेवाभावी संस्थेत जुगाराचा अड्डा, पोलिसांच्या धाडीत २० जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 05:25 PM2022-05-23T17:25:58+5:302022-05-23T17:26:14+5:30
सेवाभावी संस्थेच्या आडून जुगार अड्डा चालविण्याचा हा सेलू पॅटर्न आता चांगलाच चर्चेत आला आहे.
देवगावफाटा (परभणी): सेलू शहरातील शिवाजी पुतळ्याजवळील गोविंद लॉजच्या तळमजल्यात लोकरत्न सेवाभावी संस्थाच्या हॉलमध्ये सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांनी रविवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास धाड टाकली. पोलिसांनी २० जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून रोख रक्कम आणि साहित्य असा ३ लाख ४६ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींमध्ये राजकीय व्यक्तींचा समावेश असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पंधरा दिवसांपूर्वीचा शहरातील एका साई सेवाभावी संस्थेच्या दोन हॉलमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली होती.
सेलू शहरात रविवारी रात्री एका विवाह समारंभास सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची उपस्थिती होती. विवाह समारंभ आटोपल्यानंतर ते सेलू रेल्वे स्थानक येथे येऊन देवगीरी एक्सप्रेसने रात्री ९:२५ वाजता मुंबईकडे रवाना झाले. त्यानंतर बंदोबस्तात असलेले सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार व पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी रेल्वे स्थानक परीसरातील शिवाजी पुतळ्याजवळील गोविंद लॉजच्या तळमजल्यात लोकरत्न सेवाभावी संस्थेच्या कार्यालावर धाड टाकली. येथील हॉलमध्ये २० व्यक्ती ४ गोलाकार टेबलवर तिरट नावाचा जुगार खेळत होते. पोलिसांनी २० जणांना ताब्यात घेतले आहे. तर ५० हजार ४५० रोख, १७ मोबाईल, ८ दुचाकी असा एकूण ३ लाख ४६ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोउपनी अशोक जटाळ हे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, ९ मे रोजी सेलू शहरातीलच कृष्णनगर परिसरात साई सेवाभावी संस्थेच्या दोन खोल्यात सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर याच पोलिस पथकाने धाड टाकली होती. यावेळी जिल्ह्यातील आणि जिल्हा बाहेरील प्रतिष्टीत ४४ जणांना जुगार खेळताना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर रविवारी पुन्हा एका सेवाभावी संस्थेच्या आडून चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. सेवाभावी संस्थेच्या आडून जुगार अड्डा चालविण्याचा हा सेलू पॅटर्न आता चांगलाच चर्चेत आला आहे.
असे आहेत आरोपींची नावे :
शिरीष नारायण पांडे(रा पांडे गल्ली सेलू) विठ्ठल गंगाधर आकात (विदया नगर सेलू) भारत रावसाहेब घाटगे(रा जुना पेडगाव रोड परभणी) सुनिल माणिकराव राजुरकर( विद्या नगर सेलु)गणेश दत्तराव सवने ( रा.गायत्री नगर सेलू ) सुनिल अंकुश टाके (रा गायत्री नगर सेलु)शेख जाफर शेख उस्मान ( रा. अजीजीया नगर परभणी) शिवाजी बाबुराव खेडकर (रा सुरज मोहल्ला सेलू), लक्ष्मण भागवत खंडीग (रा दत्त नगर कारेगाव रोड परभणी),बाबासाहेब मुंजाजी मोळे( रा सुभेदार गल्ली सेलू,),मनसब मो सुलतान (रा. रहूमत नगर परभणी),अशोक गुलाबराव खूपसे( रा. विदया नगर सेलू),मतीन खान चांद खान(रा. रहेमत नगर परभणी) विनोद सोपानरा (आनंद नगर परभणी), इब्राहीम खान अमानउल्ला खान वय (रा. हाडको परभणी)दिगंबर गोविंद शेरे ( रा. शेरे गल्ली सेलू), बबन कचरू बाबा शिरसाट( कुपटा ता. सेलू), शेख बडेखाब शेख कासीम(रा.अजिजिया नगर ,परभणी),उत्तम काशिनाथ डंबाळे (रा.सरोदे नगर सेलू )दिनकर विनायकराव सोळंके( कुपटा ता. सेलू) या २० जणांना ताब्यात घेतले असुन मालक भाऊराव विठ्ठलराव सोनवणे रा. सेलू.अशा २१ जणांवर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.मालक भाऊराव सोनवणे यांनाही अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीसांनी दिली.