गायीच्या शेणापासून बनविल्या गणेशमूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:22 AM2021-09-06T04:22:24+5:302021-09-06T04:22:24+5:30
तालुक्यातील झरी येथील पद्माकर अनंतराव चव्हाण कुटुंबीय मागील दोन वर्षांपासून देशी गायीच्या शेणापासून गणेशमूर्ती तयार करीत आहे. जून ...
तालुक्यातील झरी येथील पद्माकर अनंतराव चव्हाण कुटुंबीय मागील दोन वर्षांपासून देशी गायीच्या शेणापासून गणेशमूर्ती तयार करीत आहे. जून ते ऑगस्टदरम्यानच्या तीन महिन्यांच्या कालावधीत पद्माकर चव्हाण, त्यांच्या पत्नी वैशाली, मुले उत्कर्षा व वेदान्त यांनी तब्बल ३१० गणेशमूर्ती घरच्या घरी तयार केल्या आहेत. या कामी त्यांना ए.टी.डी.चे शिक्षण घेत असलेल्या विठ्ठल जगाडे, प्रमोद यांचीही साथ मिळाली. सहा इंचांपासून ते १४ इंचांपर्यंतच्या मूर्ती त्यांनी बनविल्या आहेत. शेणात २५ टक्के शाडू माती मिसळून मूर्तीच्या मजबुतीसाठी गवार बी वापरल्याचे पद्माकर चव्हाण यांनी सांगितले. येथील नीरज इंटरनॅशनल येथे ७ ते ९ सप्टेंबर या काळात या मूर्तींचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रदीप गोलेच्छा यांच्या हस्ते ७ सप्टेंबर रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.