गंगाखेड - परळी रोडवरील अपघातात ९ जखमी.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:41 AM2021-01-13T04:41:30+5:302021-01-13T04:41:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सोनपेठ : गंगाखेड - परळी रस्त्यावरील निळा शिवारात रविवार, १० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ : गंगाखेड - परळी रस्त्यावरील निळा शिवारात रविवार, १० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दोन स्काॅर्पियो गाड्यांचा अपघात होऊन नऊजण जखमी झाले आहेत. या रस्त्यावर मागील काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
गंगाखेड - परळी रस्त्यावरील निळा शिवारात खड्डे चुकवताना हा अपघात झाला. परळीहून गंगाखेडकडे जाणारी स्काॅर्पिओ जीप (एमएच ४२ / एच ७४८४) आणि परळीकडून गंगाखेडकडे जाणारी स्काॅर्पियो (एमएच १२ / जीव्ही ४९०५) या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात (एमएच ४२ / एच ७४८४) जीपमधील मयूर नरके (३०), मोहन नरके (२८), संगीता नरके (४५, रा. औरंगाबाद), भगीरथी शिंदे (५५), प्रसाद शिंदे (४५), शिव संभा कल्याणकर (रा. बारामती) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णवाहिकेने नांदेड येथे उपचारार्थ पाठविण्यात आले आहेत. यातील मयूर नरके यांची प्रकृती चिंताजनक आहे. गंगाखेडकडून परळीकडे जाणारी (एमएच १२ / जीव्ही ४९०५) या जीपमधील शेख मतीन (२६), राजूलाल उत्बाखान व रेश्मा या जखमींना पुढील उपचारासाठी परळी येथे पाठविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच महामार्गचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कुकडे, एएसआय राजाभाऊ कातकडे, कर्मचारी सुरेश टाकरस, विष्णू भोसले, दिलीप निकाळजे यांनी घटनास्थळी येत अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरुन बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची माहिती मिळताच विजय सोळंके, रामेश्वर बचाटे, भरत सोळंके, दीपक बचाटे यांनी जखमींना दवाखान्यात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. सोनपेठ पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत या अपघाताची नोंद झालेली नव्हती.