गंगाखेड बंदला हिंसक वळण; आंदोलकांनी १० वाहने फोडून एक बस जाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 06:11 PM2018-07-23T18:11:45+5:302018-07-23T18:12:05+5:30
मराठा आरक्षण व विविध मागण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या गंगाखेड बंदला हिंसक वळण लागले.
गंगाखेड (परभणी ) : मराठा आरक्षण व विविध मागण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या गंगाखेड बंदला हिंसक वळण लागले. बंद दरम्यान आंदोलकांनी १० वाहने फोडून एक बस जाळली.
सकल मराठा समाजाच्या वतीने सोशल मिडियाद्वारे गंगाखेड बंदचे अवाहन करण्यात आल्याने अत्यावश्यक सुविधा व औषधे दुकाने वगळता सर्वच बाजारपेठ कडकडीत बंद होती. सकाळी नऊ वाजता दिलकश चौक येथे जमलेल्या आंदोलकांनी शहरातील भगवती चौक, नेहरू चौक, डॉ. आंबेडकर नगर, बस स्थानक, नवा मोंढा, डॉ. हेडगेवार चौक, राजमाता अहिल्याबाई होळकर चौक, पोलीस स्टेशन मार्गे परळी नाक्यापर्यंत जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढला. यानंतर महाराणा प्रताप चौक येथे ठिय्या आंदोलन सुरू केले.
यानंतर आंदोलकांनी परभणी राज्य मार्गावर एका कारवर दगडफेक करत काचे फोडली पुढे जात त्यांनी परळी रोडवर चार खाजगी बस, राज्य परिवहन महामंडळाच्या पाच बसेस, एक जेसीबी मशीन वर दगडफेक केली. यानंतर आंदोलक अधिक आक्रमक झाली आणि त्यांनी परभणी येथुन लातुरकडे जाणारी बस पेटवली.
आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर परभणी येथून दंगल नियंत्रण पथक बोलाविण्यात आले. या पथकाने सौम्य लाठीमार करून जमाव पांगवला. दरम्यान, आंदोलनातील हिंसाचारात पत्रकार बालासाहेब कदम व अंकुश कांबळे हे दोघे जखमी झाले आहेत.