गंगाखेडमधील गोदामे गतवर्षीच्या तूरीनेच फुल्ल; शेतकरी मात्र शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 05:53 PM2018-02-03T17:53:35+5:302018-02-03T17:57:43+5:30
तालुक्यातील शासकीय तूर खरेदी केंद्रावर गतवर्षी खरेदी केलेली तूर गोदामामध्ये तशीच पडून आहे. या गोदामामध्ये नवीन माल ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने यावर्षी शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू होणार की, नाही? असा प्रश्न शेतकर्यांसमोर निर्माण झाला आहे.
गंगाखेड (जि. परभणी)- तालुक्यातील शासकीय तूर खरेदी केंद्रावर गतवर्षी खरेदी केलेली तूर गोदामामध्ये तशीच पडून आहे. या गोदामामध्ये नवीन माल ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने यावर्षी शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू होणार की, नाही? असा प्रश्न शेतकर्यांसमोर निर्माण झाला आहे.
गंगाखेड तालुक्यामध्ये गतवर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले होते. सोनपेठ, पालम, गंगाखेड तालुुक्यासाठी गंगाखेड येथे शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. तब्बल तीन ते चार महिने शेतकर्यांना तूर विक्रीसाठी रांगा लावाव्या लागल्या. शहरातील एमआयडीसी परिसरात राज्य वखार महामंडळाच्या गोदामामध्ये तूूर खरेदी करण्यात आली. या गोदामाचे ६ हजार ३२० मे.टन धान्य साठवण क्षमता आहे. यामध्ये नाफेडने गतवर्षी खरेदी केलेली १ हजार ४७१ मे.टन, पणन महासंघाने खरेदी केलेली १ हजार ४३३ मे.टन व स्मॉल फार्मसी अॅग्री बिझनेस दिल्ली यांनी खरेदी केलेली २८१ मे.टन अशी ३ हजार १८५ मे.टन तूर भरलेली आहे. तर उर्वरित जागेमध्ये शेतकरी व काही व्यापार्यांचा माल भरलेला आहे. त्यामुळे या गोदामामध्ये जागाच शिल्लक नाही. यावर्षी शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी खरेदी विक्री संघाने शासकीय गोदामाजवळ एक खाजगी गोदाम भाडेतत्वावर घेतला आहे. मात्र या गोदामामध्ये ५० किलो वजनाचे केवळ ६ हजार पोतीच बसतील एवढी जागा आहे. गतवर्षी खरेदी केलेली तूर अजूनही गोदामामध्ये पडून असल्याने यावर्षी तूर खरेदी केंद्र लवकर सुरू होणार की, नाही? याची चिंता शेतकर्यांना लागली आहे. तसेच खरेदी केंद्र सुरू करावयाचे असल्यास नेमके कुठे केंद्र सुरू करावे? असा प्रश्न खरेदी-विक्री संघाला पडला आहे. या गोदामामधील माल इतरत्र हलविल्यानंतरच शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू होईल, अशी चर्चा होत आहे.
दीड हजार शेतकर्यांनी केली नोंदणी
यावर्षी शासनाने तुरीला ५ हजार २५० रुपये हमी भाव व २०० रुपये बोनस असे ५ हजार ४५० रुपये अधारभूत किंमत ठरविली आहे. शासकीय तूर खरेदी केंद्रावर तूर खरेदी करण्याचा निर्णय घेत तूर उत्पादक शेतकर्यांना तालुका खरेदी विक्री संघामध्ये आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील दीड हजार तूर उत्पादक शेतकर्यांनी आॅनलाईन नोंदणी करीत अर्ज सादर केले आहेत. परंतु, अपुरे कर्मचारी व सर्व्हर व्यवस्थित चालत नसल्याने केवळ १५० ते २०० शेतकर्यांच्या अर्जाची नोंदणी पूर्ण झाली आहे.
निधीअभावी खरेदी विक्री संघ बंद पडेल
शासनाच्या आदेशानुसार गतवर्षी गंगाखेड खरेदी विक्री संघाने तूर खरेदी केंद्र सुरू केले. यासाठी १३ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र शासनाने केवळ साडेनऊ लाख रुपये खर्च दिला आहे. यातील साडेतीन लाख रुपये व कमिशन स्वरुपात मिळणारे अंदाजे साडेसोळा लाख रुपयांची थकबाकी राहिली आहे. याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकार्यांकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. त्यामुळे निधीअभावी खरेदी विक्री संघ बंद पडेल, अशी भिती व्यवस्थापक लक्ष्मणराव भोसले यांनी व्यक्त केली आहे.