गंगाखेड येथे शिक्षकाकडून लाच मागणारा केंद्रप्रमुख जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 07:11 PM2018-09-07T19:11:15+5:302018-09-07T19:11:43+5:30
गोपनीय अहवालावर स्वाक्षरी करण्यासाठी एका शिक्षकाला ३०० रुपयांची लाच मागणाऱ्या केंद्रप्रमुखाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६़३० च्या सुमारास ताब्यात घेतले़
गंगाखेड (परभणी) : गोपनीय अहवालावर स्वाक्षरी करण्यासाठी एका शिक्षकाला ३०० रुपयांची लाच मागणाऱ्या केंद्रप्रमुखाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६़३० च्या सुमारास ताब्यात घेतले़ शिक्षक दिनीच ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे़
गंगाखेड तालुक्यातील शेंडगा येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत तक्रारदार शिक्षकाला पडेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख भरत रंगनाथ डहाळे यांनी चट्टोपाध्याय प्रस्तावाकरीता लागणाऱ्या गोपनीय अहवालावर स्वाक्षरी करण्यासाठी ३० आॅगस्ट रोजी ३०० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार सदरील शिक्षकाने परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती़. त्यानंतर पोलीस अधीक्षक संजय लाटकर, उपअधीक्षक रविंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अनिल गव्हाणकर, विवेकानंद भारती यांच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली़ त्यात तथ्य आढळल्याने ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६़३० च्या सुमारास केंद्रप्रमुख डहाळे यांना त्यांच्या गंगाखेडमधील घरातून ताब्यात घेतले आहे़
या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री ११ च्या सुमारास भरत रंगनाथ डहाळे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दरम्यान, आरोपी डहाळे यांना गुरुवारी गंगाखेड येथील न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़