परभणीत कपड्याच्या गोडाऊनला आग, लाखों रुपयांचे साहित्य जळून खाक
By राजन मगरुळकर | Published: January 9, 2024 02:08 PM2024-01-09T14:08:03+5:302024-01-09T14:20:52+5:30
परभणी शहरातील वैभव नगर भागातील घटना : बघ्यांची गर्दी
परभणी : जिंतूर रोड भागातील वैभव नगरमध्ये असलेल्या एका गोडाऊनसह कपड्याची निर्मिती करणाऱ्या कारखान्याला मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. अवघ्या काही वेळात या आगीने रौद्ररूप धारण केले. यात गोडाऊन आणि पत्राच्या शेडमध्ये ठेवलेल्या कपडे, विविध प्रकारच्या साहित्याला आगीने वेढले. यात लाखोंचा माल जळून खाक झाला. घटनेनंतर अग्निशमन विभागाने घटनेनंतर काही वेळातच दाखल होऊन आग आटोक्यात आणली.
परभणी शहरातील जिंतूर रोड परिसरात वैभव नगर आहे. या नागरी वस्तीमध्ये प्रशांत प्रमोदराव जाधव यांचे गेल्या पाच वर्षापासून त्यांच्या घराच्या भागात पत्राचे शेड आणि कपडे तयार करण्याचा कारखाना सोबतच गोडाऊन आहे. मंगळवारी सकाळी जाधव यांचे कुटुंबीय घरामध्ये असताना अचानक आग लागल्याचे समोर आले. घरातून धुराचे लोट बाहेर येत असल्याने त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता आग लागल्याचे समजले. यानंतर परिसरातील नागरिक मदतीसाठी तेथे आले. ही माहिती परभणी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविली असता काही वेळातच अग्निशमन अधिकारी दीपक कानोडे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने आग आटोक्यात आणण्यासाठी एक तास प्रयत्न केले. अखेर आग पूर्णपणे शमविण्यात यंत्रणेला यश आले. घटनास्थळी महावितरण आणि पोलिस यंत्रणेचे अधिकार, कर्मचारी दाखल झाले होते. दुपारपर्यंत पंचनामा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे समजले नसले तरी मात्र शाँर्टसर्किंटचा अंदाज व्यक्त होत आहे.
सुमारे ५० लाखांचे नुकसान
हा कारखाना येथे गेल्या ५ वर्षापासून आहे. येथे विविध प्रकारचे कपडे तयार केले जातात. ज्यात टी शर्ट आणि नाईट पँट तयार केली जाते. येथे ठेवण्यात आलेल्या साहित्यामध्ये ५० ते ५५ लाख रुपयांचे साहित्य जळून नुकसान झाल्याची माहिती मालक प्रशांत प्रमोदराव जाधव यांनी दिली. साधारणपणे दोन ते तीन जिल्ह्यांमध्ये येथून कपडे विक्रीसाठी ते पाठवत. यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.