गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी वाढले; आता मोजा ८८५ रुपये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:22 AM2021-08-21T04:22:23+5:302021-08-21T04:22:23+5:30
परभणी : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात आणखी २५ रुपयांनी वाढ झाली असून, आता एका सिलिंडरसाठी ८८५ रुपये ५० ...
परभणी : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात आणखी २५ रुपयांनी वाढ झाली असून, आता एका सिलिंडरसाठी ८८५ रुपये ५० पैसे मोजावे लागत आहेत. सातत्याने होणाऱ्या सिलिंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत.
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. १७ ऑगस्ट रोजी ८६० रुपयांना मिळणारे गॅस सिलिंडर आता ८८५ रुपये ५० पैशांना मिळत आहे. विशेष म्हणजे, गेल्या ८ महिन्यांत गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ६५ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. परिणामी, केंद्र शासनाविषयी नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
छोटे सिलिंडरचे दर जैसे थे
केंद्र शासनाने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली असली, तरी व्यावसायिक वापराच्या ५ किलोच्या छोट्या सिलिंडरच्या दरात कुठलीही वाढ केलेली नाही.
त्यामुळे छोटे व्यावसायिक सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
सबसिडी बंद, दरवाढ सुरूच
केंद्र शासनाकडून पूर्वी गॅस सिलिंडरवर सबसिडी देण्यात येत होती. ती नंतर ९ रुपयांवर आणण्यात आली. नंतर २ किंवा ३ रुपयांची सबसिडी देण्यात येत होती.
आता केंद्र शासनाने सर्व सबसिडी बंद केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात नागरिकांच्या आर्थिक संकटात वाढ झाली आहे.
व्यावसायिक सिलिंडर चार रुपयांनी स्वस्त
व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात मात्र ४ रुपयांची कपात केंद्र शासनाने केली आहे.
व्यावसायिक वापराचे १९ किलोचे सिलिंडर सध्या परभणीत १ हजार ६९१ रुपयांना मिळत आहे. पूर्वी ते १,६८८ रुपयांना मिळत होते.
शहरात चुली कशा पेटवायच्या?
केंद्र सरकारला सर्व सामान्य नागरिकांच्या अडचणीचे काहीही घेणे-देणे दिसत नाही. त्यामुळे सारखी विविध दरवाढ केली जात आहे. आता शहरातच चुली पेटवायच्या का?
- रंजना शिंदे, गृहिणी, परभणी.
कोरोनामुळे आगोदरच आर्थिक चणचण जाणवत आहे. त्यात तेल, किराणा महागला. आता गॅस सिलिंडर महागले आहे. घर कसे चालवावे, सरकारने जनतेची ओढाताण लक्षात घेतली पाहिजे.
- संगीता शेळके, गृहिणी, परभणी.