घरात गॅस सिलेंडर लिक झाले, कुटुंब गावाहून परत येताच उडाला भडका, पाचजण होरपळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 12:33 IST2025-03-24T12:33:10+5:302025-03-24T12:33:49+5:30
सेलू तालुक्यातील मालेटाकळी येथील घटना, जखमींना उपचारासाठी परभणीला हलवले

घरात गॅस सिलेंडर लिक झाले, कुटुंब गावाहून परत येताच उडाला भडका, पाचजण होरपळे
सेलू (जि.परभणी) : बंद घरात गॅस सिलेंडर लिकिज झाला होता. दरवाजा उघडून गॅस लावताना गॅसचा भडका झाला. यामध्ये पाचजण भाजले असून त्यांच्यावर परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सेलू तालुक्यातील मालेटाकळी येथे रविवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास घडली.
मालेटाकळी येथील अच्युतराव ताठे हे कुटुंबासह गावी गेले होते. दरम्यान, घरात गॅस लिकिज झाला होता. त्यांनी रविवारी सकाळी १०:३० वाजता येऊन घराचा दरवाजा उघडून प्रवेश केला. गॅस लावताच एकच भडका उडाला. यामध्ये मीना अच्युत ताठे, अच्युत ताठे, पूजा ताठे, शिवानी ताठे व सोबत डासाळा येथील आलेला पाहुणा बापूराव बागल यांचे अंग भाजले. गावातील खासगी वाहनाने या जखमींना सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणले.
प्रथमोपचार करून या पाचजणांना परभणी शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केल्याची माहिती पोलिस पाटील सुनील ताठे यांनी दिली. जखमींमध्ये मीना ताठे यांना मोठी दुखापत झाली आहे, अशी माहिती पुढे आली आहे. घटनेतील जखमींचा जबाब घेण्यासाठी पोलिस अंमलदार यांना रुग्णालयात पाठविल्याची माहिती पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांनी दिली आहे.