गावरान तुपातील मिठायांनी वाढली दिवाळीची गोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 07:20 PM2018-11-07T19:20:03+5:302018-11-07T19:20:36+5:30
दिवाळी सणासाठी वेगवेगळे पदार्थ तयार करून खाण्याची प्रथा रुढ आहे़
परभणी : दिवाळी सणासाठी यंदाच्या बाजारपेठेत अस्सल गावरान तुपातील खाद्य पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत़ त्यामुळे या पदार्थांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असून, आठवडाभरापासून खाद्य पदार्थांची मागणी वाढली आहे़
दिवाळी सणासाठी वेगवेगळे पदार्थ तयार करून खाण्याची प्रथा रुढ आहे़ त्यात गोड पदार्थांबरोबरच लज्जतदार आणि चटकदार पदार्थांचा समावेश असतो़ प्रत्येक घरी दिवाळीचा सण साजरा करताना गोड पदार्थ आवर्जून केले जातात़ त्यात लाडू, बालूशाही, करंज्या आदी पदार्थांचा समावेश आहे़ तसेच चटकदार पदार्थांमध्ये चिवड्यांचे वेगवेगळे प्रकार केले जातात़ मागील काही वर्षांपासून विकतचे पदार्थ आणून दिवाळी साजरी केली जात आहे़
दैनंदिन जीवनमान धकाधकीचे झाल्याने व्यावसायिकांनीही नागरिकांची गरज लक्षात घेऊन दिवाळी सणासाठी नाविन्यपूर्ण पदार्थ बाजारात विक्रीसाठी आणले आहेत़ या पदार्थांना ग्राहकांची मागणीही वाढत आहे़ ग्राहकांचा प्रतिसाद पाहता व्यावसायिकांनी मागील महिनाभरापासून दिवाळीची तयारी सुरू केली आहे़ शहरातील स्वीट मार्टस्मधून असे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत़ आठ दिवसांपासून खाद्य पदार्थांच्या खरेदीसाठी या दुकानांवर गर्दी वाढली आहे़ परभणी शहरात काही व्यावसायिकांनी तर स्वतंत्र दालन उभारून पाकीटबंद खाद्य पदार्थांची विक्री सुरू केली आहे़ यावर्षी या खाद्य पदार्थांच्या खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले़
दिवाळीसाठी नाविन्यपूर्ण पदार्थ
यावर्षीच्या दिवाळीसाठी नाविन्यपूर्ण पदार्थ विक्रीसाठी आणले असून, त्यास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मोती नमकीनचे दीपक तलरेजा यांनी दिली़ ते म्हणाले, आम्ही सर्व पदार्थ गावरान तुपात तयार केले आहेत़ त्यात बालूशाही, मोतीचूर लाडू, बेसन लाडू, म्हैसूर पाक, डिंकाचे लाडू, करंजी आदी पदार्थांचा समावेश आहे तर चिवड्यांच्या प्रकारात काजू लच्छा, बदाम लच्छा, मस्तानी मसूर, लसूनी मिक्सर, जय महाराष्ट्र नमकीन, शाही पोहा, बिकानेरी भुजिया, लेमन भुजिया असे पदार्थ ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहेत़ त्याच प्रमाणे ग्रीन डिलाईट हा संपूर्णत: कोथिंबीरपासून बनविलेला पदार्थ ग्राहकांच्या पसंतीला उतरत असल्याचे दीपक तलरेजा यांनी सांगितले़
गिफ्ट पॅक पदार्थांना मागणी
दिवाळीसाठी भेटवस्तू म्हणून नाविन्यपूर्ण पदार्थ दिले जातात़ हे पदार्थ आकर्षक पॅकिंगमध्ये देण्याची प्रथा आहे़ अशा गिफ्ट पॅकींग पदार्थांची मागणी वाढत आहे. ५० रुपयांपासून ते १ हजार रुपयांपर्यंत गिफ्ट पॅक पदार्थांना मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले़