Geeta News : 'गीता आमची मुलगी'; जिंतूरच्या वाघमारे कुटुंबियांनी केला दावा, डीएनए टेस्टची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 01:56 PM2021-03-11T13:56:34+5:302021-03-11T14:04:31+5:30

Geeta returned from Pakistan in 2015: पाकिस्तानातून आलेल्या गीताबाबत वाघमारे कुटुंबियांचा दावा केल्याचा पहल संस्थेची माहिती

Geeta News: 'Geeta is our daughter'; Jintur's Waghmare family claims, waiting for DNA test | Geeta News : 'गीता आमची मुलगी'; जिंतूरच्या वाघमारे कुटुंबियांनी केला दावा, डीएनए टेस्टची प्रतीक्षा

Geeta News : 'गीता आमची मुलगी'; जिंतूरच्या वाघमारे कुटुंबियांनी केला दावा, डीएनए टेस्टची प्रतीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देसाधारणत: २० वर्षांपूर्वी रेल्वेने प्रवास करीत असताना १९९८ मध्ये गीता ही मूकबधीर मुलगी पाकिस्तानात गेली होती.गीताच्या कुटुंबियांची ओळख पटविण्यासाठी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयातून डी.एन.ए. तपासणीची परवानगी घेतली

परभणी : २० वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानात गेलेल्या मूकबधीर गीताच्या कुटुंबियांचा शोध सुरू असून, याच दरम्यान जिंतूर येथील मीना वाघमारे यांनी गीता ही आपलीच मुलगी असल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात डीएनए चाचणी झाल्यानंतरच तिच्या कुटुंबियांचे सत्य पुढे येईल. त्यानंतरच परराष्ट्र मंत्रालयाच्या परवानगीनुसार पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती येथील पहल फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आली.

साधारणत: २० वर्षांपूर्वी रेल्वेने प्रवास करीत असताना १९९८ मध्ये गीता ही मूकबधीर मुलगी पाकिस्तानात गेली होती. त्यावेळी ती ६ वर्षांची होती. त्यानंतर भारत सरकारने गीताला भारतात आणले असून, तिच्या कुटुंबियांचा सध्या शोध सुरू आहे. सुरुवातीला तिला इंदोर येथील एका स्वयंसेवी संस्थेच्या ताब्यात दिले होते. जुलै २०२० मध्ये या संस्थेकडून आनंद सर्व्हीस सोसायटीचे ज्ञानेंद्र पुरोहित यांच्याकडे गीताला सुपूर्द करण्यात आले. मध्यप्रदेशात काही भागात कुटुंबियांचा शोध घेण्यात आला. गीताने आपल्या गावाची ओळख सांगताना घराच्या आसपास रेल्वेस्टेशन, नदी आणि उसाची शेती असल्याचे सांगितले. त्यामुळे डिसेंबर २० मध्ये तिला परभणी येथील पहल फाऊंडेशनच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील  गंगाखेड, पूर्णा आणि जिंतूर येथे काही ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्यात आली. त्यावेळी जिंतूर येथील तसेच सध्या औरंगाबाद येथे वास्तव्यास असणाऱ्या मीना वाघमारे यांनी गीता ही आपलीच मुलगी असल्याचा दावा केला. त्यामुळे मीना, त्यांची बहिण पूजा बनसोडे आणि गीता यांची जिंतूर येथे भेट घालून देण्यात आली. 

गीताच्या पोटावर जळाल्याची खून असल्याचे या कुटुंबियांतील वृद्धेने सांगितले. त्यानुसार पाहणी केली असता गीताच्या पोटावर तशी खूण आढळली आहे. परंतु, मीना वाघमारे यांनी त्यांची मुलगी हरवल्या संदर्भात कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविलेली नाही किंवा काही जुनी कागदपत्रे आढळली नाहीत. त्यामुळे गीताच्या कुटुंबियांची ओळख पटविण्यासाठी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयातून डी.एन.ए. तपासणीची परवानगी घेतली जाणार आहे. ही परवानगी अद्याप तरी मिळाली नाही, त्यानंतरच  परराष्ट्र मंत्रालयाच्या निर्देशानुसार पुढील प्रक्रिया केली जाईल, असे परभणी येथील पहल फाऊंडेशनचे अशोक सेलगावकर यांनी सांगितले.

गीता सध्या काय करतेय...
मूकबधीर गीता सध्या परभणी येथे पहल फाऊंडेशनकडे आहे. तिला आत्मनिर्भार करण्यासाठी पहल फाऊंडेशनचे अनिकेत सेलगावकर हे सांकेतिक भाषा शिकवित आहेत. त्याचप्रमाणे इंग्रजी, हिंदी या भाषांचे मूलभूत ज्ञान तिला दिले जात आहे. गीताला आत्मनिर्भर करण्यासाठी किमान आठवीपर्यंतचे शिक्षण देऊन तिला नोकरी करता यावी व ती स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभी रहावी, यासाठी गीताला शिक्षण दिले जात आहे.

Web Title: Geeta News: 'Geeta is our daughter'; Jintur's Waghmare family claims, waiting for DNA test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.