ढगाळ वातावरणामुळे उन्हापासून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:17 AM2021-04-10T04:17:03+5:302021-04-10T04:17:03+5:30
वाहतूक बंद असल्याने प्रवाशांची तारांबळ परभणी :कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील एस.टी. महामंडळाची सेवा बंद करण्यात आली आहे. मागील दहा ...
वाहतूक बंद असल्याने प्रवाशांची तारांबळ
परभणी :कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील एस.टी. महामंडळाची सेवा बंद करण्यात आली आहे. मागील दहा दिवसांपासून एस.टी. बस धावत नसल्याने अनेक प्रवाशांची तारांबळ उडत आहे. जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी किंवा जिल्ह्यांतर्गत प्रवासाची सुविधाच उपलब्ध नसल्याने नाइलाजाने खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे.
रस्त्याच्या कडेचा खड्डा बनला धोकादायक
परभणी : येथील वसंतराव नाईक यांच्या पुतळा परिसरात महानगरपालिकेने व्हॉल्व्ह टाकण्यासाठी खड्डा खोदला आहे. मागील आठ दिवसांपासून हा खड्डा जशाच्या तसा आहे. रात्रीच्या वेळी खड्डा लक्षात न आल्याने अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. या ठिकाणी व्हॉल्व्ह टाकण्याचे काम पूर्ण झाले असल्यास खड्डा बुजवून घ्यावा, अशी वाहनधारकांची मागणी आहे.
शहरात वाढला धुळीचा त्रास
परभणी : शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धूळ वाढली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यात माती साचत असून, वाहनांच्या वर्दळीमुळे ही माती हवेत मिसळून धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची सारखीच अवस्था झाली असून, मनपाने याकडे लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
स्वच्छतागृहाअभावी व्यापाऱ्यांची कुचंबणा
परभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरात स्वच्छतागृह नसल्याने या भागातील व्यापाऱ्यांची कुचंबणा होत आहे. या भागात काही दिवसांपूर्वी मनपाने तात्पुरते स्वच्छतागृह उभारले होते; मात्र काही दिवसांतच या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली. सध्या व्यापारी व इतर नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. मनपाने येथील नागरिकांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.