'यामुळे' दरेकरांनी घेतला बँक अधिकाऱ्यांचा समाचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 04:10 PM2020-10-05T16:10:59+5:302020-10-05T16:12:09+5:30
शासनाने आणि बॅंकेने एकत्र येऊन सुलभ पध्दतीने पीक कर्ज द्यावे. नसता पीक कर्जाचा प्रश्न पेटवू, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिला आणि बँक अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
सेलू : रब्बी हंगाम तोंडावर असतानाही खरीपातील पिकांसाठीचे पीक कर्ज मिळत नाही. तीन महिन्यांपासून शेतकरी बॅंकेच्या दारात उभा आहे. शासनाने आणि बॅंकेने एकत्र येऊन सुलभ पध्दतीने पीक कर्ज द्यावे. नसता पीक कर्जाचा प्रश्न पेटवू, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिला आणि बँक अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
दरेकर यांनी सेलूतील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत सोमवारी दुपारी ११. ३० वा. अचानक प्रवेश करून बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकांना धारेवर धरून मुख्य दरवाज्यावर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आ. मेघना बोर्डीकर साकोरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुभाष कदम, सुरेश भुमरे, बाजार समितीचे माजी सभापती रविंद्र डासाळकर, उपसभापती सुंदर गाडेकर, पंकज निकम, कपिल फुलारी आदी उपस्थित होते.
सेलू तालुक्यातील तब्बल ८ हजार ७९० शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे प्रस्ताव संबंधित बॅकेत पडून आहेत. तीन महिन्यांपासून शेतकरी बॅंकेच्या दारात उभा आहे. पंरतु, त्यांना पीक कर्ज देण्यासाठी बॅंकेकडून अडवणूक केली जात आहे. त्यामुळे दरेकर यांनी आक्रमक पवित्रा घेऊन बँकेत ठिय्या आंदोलन केले आणि बँक अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.