गंगाखेड येथील गोदापात्रातील मंदिरे पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:48 PM2019-09-28T12:48:18+5:302019-09-28T12:51:25+5:30
जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले.
गंगाखेड: गोदावरी नदी पात्रात आलेल्या पाण्यामुळे शहर परिसरात नदी पात्रात असलेली छोटी मोठी प्राचीन मंदिरे व गोदावरी नदीचा घाट सुमारे चार वर्षांनंतर पाण्याखाली गेला असून श्री नृसिंह मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे.
जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. तसेच गोदावरी नदी पात्रात असलेले परभणी जिल्ह्यातील ढालेगाव व मुदगल बंधारे भरल्याने या बंधाऱ्यातून ही गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे नदीचे पात्र तुडूंब भरून वाहत आहे. दि. २८ सप्टेंबर शनिवार रोजी सकाळी १० वाजता गंगाखेड येथील गोदावरी नदीच्या पात्रात ३८००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. गोदावरी नदीच्या पात्रातील पुराच्या पाण्याची उंची चार मिटरने वाढल्याने गोदावरी नदीच्या बॅक वॉटर मुळे परभणी रस्त्याने सुनेगाव मार्गे मुळी, धारखेड, नागठाणा, अंगलगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावरील सुनेगाव पुलावर पाणी आल्याने हा मार्ग बंद झाला आहे.
जायकवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे पाणी पातळी अधिक वाढण्याची शक्यता असल्याचे पूरनियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले असून गोदावरी नदी काठच्या ग्रामस्थांनी सतर्क राहत कोणीही नदी पात्रात उतरू नये, वाहने, जनावरे, विद्युत मोटारी पाण्यात सोडू नये तसेच कोणतीही जीवित, वित्त हाणी होणार नाही याची दक्षता गोदावरी नदी काठावरील सर्व नागरिकांनी घ्यावी. विशेषकरून विद्यार्थी व तरुणांनी नदीपात्रात, पुलाच्या कठड्यांवर सेल्फी घेण्यासाठी जावू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.