गावाबाहेर जाताय.... कुलूपबंद घर सांभाळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:19 AM2021-09-27T04:19:37+5:302021-09-27T04:19:37+5:30
परभणी : मागच्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे गावाबाहेर जाण्यापूर्वी नागरिकांना कुलूपबंद असलेले ...
परभणी : मागच्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे गावाबाहेर जाण्यापूर्वी नागरिकांना कुलूपबंद असलेले घर सांभाळण्याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले, जिल्ह्यातील आर्थिक उलाढालही मंदावली आहे. आता कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी, मागच्या काही महिन्यांमध्ये जिल्ह्यात चोऱ्या आणि घरफोड्यांच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही दररोज चोरीच्या एक-दोन घटना घडतच आहेत. त्यामुळे घराला कुलूप लावून बाहेर जायचे म्हटले तरी, नागरिकांना स्वत:च्या घराची काळजी घ्यावी लागणार आहे.
२०० हून अधिक घरफोड्या
जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात २०० पेक्षा अधिक घरफोड्या झाल्या आहेत. शहरातील कुलूपबंद घरे फोडण्याचे प्रकार होत आहेत. मागील महिन्यात तर शहरातील त्रिमूर्तीनगर, कारेगाव रोड या भागात घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे जेरबंद झाले आहेत.
अनलॉकनंतर वाढल्या चोऱ्या
अनलॉक झाल्यानंतर चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अनलॉक प्रक्रियेमुळे अनेकांनी प्रवासाला प्रारंभ केला. त्यामुळे कुलूपबंद असलेली घरे फोडण्याचे प्रमाण वाढले आहे.
चोरटे पकडले; समस्या कायम
पोलिसांनी घरफोड्यांचा तपास करीत असताना दोन अट्टल चोरटे काही दिवसांपूर्वी जेरबंद केले आहेत. या चोरट्यांनी पालम, गंगाखेड या भागात चोरी केल्याची कबुलीही दिली आहे. विशेष म्हणजे या चोरट्यांनी केलेले २३ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. मात्र तरीही जिल्ह्यात इतर भागात चोरीच्या घटना घडतच आहेत. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.