दोन वेळेस दिले सोन्याचे शिक्के, तिसऱ्यावेळी निघाले पितळी; सालगड्याची झाली फसवणूक
By राजन मगरुळकर | Published: February 21, 2023 05:39 PM2023-02-21T17:39:56+5:302023-02-21T17:40:28+5:30
एक लाख दहा हजार रुपये घेऊन ६३ पितळेचे शिक्के देत फसवणूक केली
परभणी : साल गड्याला दोन वेळेला खरे सोन्याचे शिक्के देऊन विश्वास संपादित केल्यावर तिसऱ्या वेळेस दोन जणांनी एक लाख दहा हजार रुपये घेऊन ६३ शिक्के सोन्याचे असल्याचे भासवून पितळेचे शिक्के देत फसवणूक केली आहे. हा प्रकार ११ फेब्रुवारीला सायंकाळी नांदखेडा शिवारात घडला आहे. याप्रकरणी नानलपेठ ठाण्यात १७ फेब्रुवारीला दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला.
जिंतूर तालुक्यातील धमधमचे नागनाथ आबाजी घुले यांनी फिर्याद दिली. घुले हे नांदखेडा रोडवर शरद देशमुख यांच्या शेतात सालगडी म्हणून कामाला आहेत. घुले यांच्या ओळखीतील सुखदेव घुगे यांनी त्यांच्याशी संपर्क साधून माझ्याकडे सोने असल्याचे सांगून विश्वास संपादित करण्याचा प्रयत्न केला. नऊ फेब्रुवारीला सुखदेव घुगे यांनी त्यांच्याकडे असलेल्या सोन्यामधील एक छोट्या स्वरूपाचा शिक्का घुले यांना आणून दिला व घुले यांच्याकडून दहा हजार घेतले. हा शिक्का तपासल्यानंतर तो खरा आढळला. पुन्हा एकदा असाच प्रकार १० फेब्रुवारीला घडला. हे पाच शिक्केसुद्धा तपासले असता खरे निघाले. त्यानंतर पुढील फसवणुकीचा प्रकार घडला.
असा घडला बनवाबनवीचा प्रकार
सुखदेव घुगे यांनी ११ फेब्रुवारीला घुले यांना फोन करून तुमच्या पैशाचा मेळ झाला की नाही, का मी दुसरे ग्राहक बघू, असे म्हटले. त्यावर घुले यांनी पैशाचा मेळ झाला की कळवितो, असे सांगितले. त्याच दिवशी रात्री साडेसातच्या सुमारास घुगे, एक अनोळखी घुले यांच्या आखाड्याच्या बाजूस रस्त्यावर आले. त्यावेळी घुगे यांनी घुले यांनी दिलेले पैसे मोजून घेतले व त्याच्याकडील एका दस्तीमध्ये ठेवलेले ६३ शिक्के घुले यांना दिले. त्यानंतर घुगे व अन्य अनोळखी तेथून निघून गेले. हे शिक्के खरे की खोटे हे तपासण्यासाठी घुले एका सोनाराच्या दुकानावर गेले त्यांना दुकानदाराने तो शिक्का पितळेचा असल्याचे सांगितले. त्यावरून सुखदेव घुगे यांनी दिलेले ६३ शिक्के हे खोटे असून ते पितळेचे असल्याचे घूले यांना समजले.