यंदाही प्रकल्पांना ‘अच्छे दिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:13 AM2021-06-21T04:13:52+5:302021-06-21T04:13:52+5:30
परभणी : मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी प्रकल्पांमध्ये पाणी साठा वाढला असून, जून महिन्याच्या २० दिवसांतच येलदरी प्रकल्पात २८.२९९ दलघमी ...
परभणी : मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी प्रकल्पांमध्ये पाणी साठा वाढला असून, जून महिन्याच्या २० दिवसांतच येलदरी प्रकल्पात २८.२९९ दलघमी आणि निम्न दुधना प्रकल्पात १३ दलघमी नवीन पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे या वेळेसही प्रकल्प तुडुंब होण्याची आशा निर्माण झाली आहे.
प्रकल्पांच्या पाणीसाठ्यावरच पुढील वर्षीच्या उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची भिस्त असते. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. मात्र मागील वर्षी प्रकल्पांत मोठा पाणीसाठा झाल्याने यावर्षीच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवली नाही. त्याचप्रमाणे रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांनाही पाणी उपलब्ध झाले. आता यावर्षीदेखील पावसाळ्यापूर्वीपासूनच दमदार पाऊस झाला आहे. परिणामी प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने यंदाही लवकरच प्रकल्प पाण्याने तुडुंब होण्याची आशा निर्माण झाली आहे.
जिंतूर तालुक्यातील येलदरी हा जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यावर परभणीसह हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना चालविल्या जातात. शिवाय ग्रामीण भागातील अनेक पाणीपुरवठा योजनांसाठी येलदरी हाच स्रोत आहे. त्यामुळे या प्रकल्पात पाणीसाठा झाल्यानंतर टंचाईची चिंता दूर होते. ९२७ दलघमी क्षमतेच्या येलदरी प्रकल्पात सध्या ४४७.७०३ दलघमी पाणीसाठा आहे. ५५ टक्के जिवंत पाणीसाठा या प्रकल्पात आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात प्रकल्पाच्या क्षेत्रात २७४ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात नवीन पाण्याची आवक झाली आहे. मागील २० दिवसांत २८.२९९ दलघमी पाण्याची आवक प्रकल्पात झाली आहे. आणखी पावसाळ्याचे तीन महिने शिल्लक असून, सध्या प्रकल्पात ५५ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे लवकरच हा प्रकल्प १०० टक्के भरण्याची आशा निर्माण झाली आहे.
सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातही या पावसाळ्यात १३ दलघमी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पातही ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पातही येत्या काही दिवसांतच पाण्याने तुडुंब होण्याची आशा आहे.
मासोळीत २३ टक्के पाणीसाठा
गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पातही यावर्षीच्या पावसाळ्यात नवीन पाणी दाखल झाले आहे. सध्या या प्रकल्पात ६.२१९ दलघमी पाणीसाठा झाला आहे. गंगाखेड तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असले तरी मागील २० दिवसांत या प्रकल्पात १ दलघमी पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
जिल्ह्यात सरासरी १९८ मि.मी. पाऊस
यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात १९८.९ मि.म. पाऊस झाला आहे. दरवर्षी २० जूनपर्यंत ९६.९ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित आहे. त्या तुलनेत १९८.९ मि.मी. पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत जिल्ह्यात आतापर्यंत २०५ टक्के अधिक पाऊस झाला आहे.