गुड न्यूज, कोरोनाची लस परभणीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:15 AM2021-01-14T04:15:08+5:302021-01-14T04:15:08+5:30

परभणी : मागच्या आठ महिन्यांपासूनची कोरोना लसीची प्रतीक्षा १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास संपली असून, कोरोना या ...

Good news, corona vaccine filed in Parbhani | गुड न्यूज, कोरोनाची लस परभणीत दाखल

गुड न्यूज, कोरोनाची लस परभणीत दाखल

Next

परभणी : मागच्या आठ महिन्यांपासूनची कोरोना लसीची प्रतीक्षा १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास संपली असून, कोरोना या महाभयंकर आजारावरील लसीचे ९ हजार ३३० डोस‌ जिल्ह्याला मिळाले आहेत. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासह आरोग्य विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही लस उतरवून घेण्यात आली.

कोरोनाच्या संसर्गामुळे मागील आठ महिने जिल्हावासीय धास्तावलेले होते. कोरोनाच्या संसर्गावर कोणतीही लस नसल्याने केवळ प्रतिबंधात्मक उपाय करणे एवढेच नागरिकांच्या हाती होते. त्यातच तीन-चार महिन्यांपासून कोरोनाची लस येणार, या बातम्या नागरिकांना दिलासा देत असल्या तरी प्रत्यक्षात लस कधी येणाऱ्या, याची खरी प्रतीक्षा होती. ती आज पूर्ण झाली.

१६ जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी येथील आरोग्य विभागाने तयारी केली आहे. आरोग्य विभागातील औषध निर्माण अधिकारी मंगला खिस्ते या बुधवारी सकाळीच लस आणण्यासाठी औरंगाबादकडे रवाना झाल्या होत्या. सायंकाळी ६.३० वाोण्याच्या सुमारास सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीचे कोविशिल्ड या लसीचे ९ हजार ३३० डोस घेऊन त्या परभणीत दाखल झाल्या. येथील जायकवाडी परिसरातील शीतगृहात ही लस उतरविण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकरराव देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कोणाला मिळणार सर्वात आधी लस

शासकीय आणि खाजगी आरोग्य विभागात काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम ही लस दिली जाणार आहे. आरोग्य विभागातील ८ हजार ५१७ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शासनाच्या कोविन ॲपवर लस घेण्यासाठी नोंदणी केली आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जाणार असून, त्यासाठी २ हजार ४१४ जणांची नोंदणी झाली आहे.

एका वायलमध्ये १० डोस‌

जिल्ह्यासाठी कोविशिल्डच्या ९३३ वायल (बॉटल) प्राप्त झाले आहेत. एका वायलमध्ये ०.५ एम.एल.चे १० डोस तयार होतात. याप्रमाणे ९ हजार ३३० डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत.

शुक्रवारी ३०० जणांना लसीकरण

१६ जानेवारी रोजी प्रत्यक्ष लसीकरण केले जाणार आहे. शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात तीन केंद्रांवर ही मोहीम राबविली जाणार आहे. जिल्हा रुग्णालय, महानगरपालिकेचे जायकवाडी येथील रुग्णालय आणि सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात हे लसीकरण होणार आहे. प्रत्येक केंद्रावर १०० लाभार्थी याप्रमाणे ३०० जणांना या दिवशी लसीकरण केले जाणार आहे.

Web Title: Good news, corona vaccine filed in Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.