शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! शेतीत उपयुक्त सौर उपकरणांच्या निर्मितीसाठी विद्यापीठाने घेतला महत्वाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 06:23 PM2021-03-17T18:23:04+5:302021-03-17T18:25:54+5:30
High production of useful solar equipment in agriculture on track येथील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाच्या वतीने पशुशक्तीचा योग्य वापर योजनेअंतर्गत विकसित केलेले विविध सौर उपकरणे शेतकऱ्यांच्या पसंतीला पडले आहेत.
परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प योजनेअंतर्गत विकसित शेती अवजारे व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या सौर उपकरणांच्या निर्मितीसाठी विद्यापीठाने १५ मार्च रोजी नाशिक जिल्ह्यातील मे. इन्व्हेटिव्ह सोल्युशन्स या कंपनीशी व्यावसायिक सामंजस्य करार केला आहे. कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारामुळे कमी श्रमामध्ये अधिक शेतीकाम करण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या शेती अवजारांची मागणी पूर्ण होणार आहे.
येथील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाच्या वतीने पशुशक्तीचा योग्य वापर योजनेअंतर्गत विकसित केलेले विविध सौर उपकरणे शेतकऱ्यांच्या पसंतीला पडले आहेत. राज्यातील विविध भागांतून या उपकरणांना मागणी होत आहे. ही बाब लक्षात घेऊन उपकरणे बनविण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील मे. इन्व्हेटिव्ह सोल्युशन्स या कंपनीशी विद्यापीठाने व्यावसायिक करार केला आहे. कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय खोडके, यंत्र विकसित करणाऱ्या संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोलंकी, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत विभागप्रमुख डॉ. राहुल रामटेके, कंपनीचे संचालक व अभियंते प्रशांत पवार, सौरभ जाधव, शास्त्रज्ञ डी.डी. टेकाळे, ए. ए. वाघमारे, डॉ. मदन पेंडके आदींची उपस्थिती होती. या करारावर विद्यापीठाच्या बाजूने संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, डॉ. स्मिता सोलंकी तर कंपनीच्या वतीने प्रशांत पवार यांनी स्वाक्षरी केली.
कमी श्रमामध्ये अधिक शेतीकाम करण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेले शेती अवजारे शेतकऱ्यांना उपयुक्त असून, त्यामुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. या सामंजस्य करारामुळे शेतकऱ्यांची यंत्राची मागणी पूर्ण होणार असल्याचे डॉ. अशोक ढवण यांनी यावेळी सांगितले.
कोणती यंत्रे बनविली जाणार
या सामंजस्य करारामुळे विद्यापीठाने विकसित केलेली सौरऊर्जा आधारित जनावरे/पक्षी घाबरवणारे यंत्र, सौर ड्रायर, बैलचलित फवारणी यंत्र, काडी कचरा गोळा करणारे यंत्र, गादी वाफा करून प्लास्टिक अंथरवणारे यंत्र, तीन पासेचे फनासहित कोळपे, ट्रॅक्टर चलित बूम फवारणी संरचना, ऊस व हळद पिकात भर लावणारे यंत्र, बहुउद्देशीय पेरणीसह फवारणी यंत्र आदी यंत्रांची निर्मिती कंपनीला करता येणार आहे.