मराठवाड्यातील प्रवाशांसाठी आनंदवार्ता; पूर्णा-जालना, जालना-नांदेड विशेष रेल्वे सुरू
By राजन मगरुळकर | Published: June 10, 2023 04:21 PM2023-06-10T16:21:37+5:302023-06-10T16:22:09+5:30
याशिवाय मेडचल-नांदेड डेमू रेल्वेचा विस्तार काचीगुडा ते पूर्णा स्थानकापर्यंत करण्यात आला आहे.
परभणी : दक्षिण मध्य रेल्वे विभागाने प्रवाशांची मागणी लक्षात घेता दोन विशेष रेल्वे मराठवाडा विभागातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या रेल्वे शनिवारपासून धावण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये पूर्णा ते जालना आणि जालना ते नांदेड या विशेष रेल्वेचा समावेश आहे. याशिवाय मेडचल-नांदेड डेमू रेल्वेचा विस्तार काचीगुडा ते पूर्णा स्थानकापर्यंत करण्यात आला आहे.
रेल्वे क्रमांक (०७९७०) मेडचल-नांदेड डेमू रेल्वे ही काचीगुडा ते पूर्णा दरम्यान विस्तारीकरणात धावणार आहे. ही रेल्वे काचीगुडा येथून दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी सुटणार आहे. ही रेल्वे सिताफलमंडी, मलकजगिरी, बोलाराम, कोचमपल्ली, मेडचल, नांदेड, पूर्णा अशी धावणार आहे. रात्री ९.३५ मिनिटांनी ही रेल्वे पूर्णा येथे पोहोचणार आहे. रेल्वे क्रमांक (०७१८१) पूर्णा ते जालना ही रेल्वे दररोज रात्री नऊ वाजता पूर्णा येथून सुटणार आहे. ही रेल्वे परभणी, पेडगाव, मानवत रोड, सेलू, परतुर मार्गे जालना येथे रात्री १.५० वाजता पोहोचणार आहे. तर रेल्वे क्रमांक (०७१८२) ही परतीच्या प्रवासात जालना ते नांदेड अशी धावणार आहे. ही रेल्वे दररोज रात्री ९.२५ मिनिटांनी जालना येथून सुटणार आहे. परतुर, सेलू, मानवत रोड, परभणी, पूर्णा मार्गे नांदेड येथे मध्यरात्री तीन वाजता पोहोचणार आहे.
सिकंदराबाद-नगरसोल विशेष रेल्वेच्या सहा फेऱ्या
दक्षिण मध्य रेल्वे विभागाने सिकंदराबाद ते नगरसोल या दोन स्थानकाच्या दरम्यान जून महिन्यात सहा विशेष फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रेल्वे क्रमांक (०७५१७) सिकंदराबाद- नगरसोल ही रेल्वे १४, २१, २८ जूनला बुधवारी सायंकाळी ५ वाजता सिकंदराबाद येथून सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी आठ वाजता सदरील रेल्वे नगरसोल येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात रेल्वे क्रमांक (०७५१८) नगरसोल-सिकंदराबाद ही रेल्वे १५, २२, आणि २९ जून रोजी गुरुवारी रात्री दहा वाजता नगरसोल येथून सुटणार आहे. ही रेल्वे शुक्रवारी सकाळी १०.५० वा. सिकंदराबाद पोहोचणार आहे. ही रेल्वे लिंगमपल्ली, विकाराबाद, जहीराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, परळी, गंगाखेड, परभणी, सेलू, जालना, रोटेगाव मार्गे नगरसोल जाणार आहे. या रेल्वेला वातानूकूलित, शयनयान, सर्वसाधारण डब्बे जोडलेले असतील.