प्रवाशांसाठी खुशखबर! काचीगुडा-रोटेगाव एक्सप्रेस नगरसोलपर्यंत धावणार
By राजन मगरुळकर | Published: April 14, 2023 04:11 PM2023-04-14T16:11:42+5:302023-04-14T16:11:46+5:30
दमरेच्या सिकंदराबाद परिचालन विभागाने काढले पत्र
परभणी : काचीगुडा ते रोटेगाव दरम्यान धावणारी दैनंदिन एक्सप्रेस रेल्वे आता नगरसोलपर्यंत धावणार आहे. याबाबतचे पत्र दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागाच्या परिचालन अधिकाऱ्यांनी गुरुवारी काढले आहे. काचीगुडा-रोटेगाव रेल्वे १७ एप्रिलपासून रोटेगाव ऐवजी नगरसोलपर्यंत धावणार आहे.
रेल्वे क्रमांक (१७६६१) काचीगुडा-रोटेगाव दैनंदिन एक्सप्रेस रेल्वे काचीगुडा येथून दररोज पहाटे ४.५० वाजता सुटते. ही रेल्वे त्याच दिवशी रात्री ८.१५ वाजता रोटेगाव येथे पोहोचते. आता ही रेल्वे १७ एप्रिलपासून काचीगुडा-नगरसोल अशी धावणार आहे. रोटेगाव येथून तारूर आणि नगरसोल या दोन स्थानकावर ही रेल्वे थांबेल. नगरसोल येथे रात्री ९.०५ मिनिटांनी ही रेल्वे पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासात १८ एप्रिलपासून रेल्वे क्रमांक (१७६६२) नगरसोल -काचीगुडा अशी धावणार आहे. ही रेल्वे नगरसोल येथून पहाटे ५.१५ मिनिटांनी निघणार आहे. यानंतर ती रोटेगाव येथे ५.४० मिनिटांनी तर पुढे छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, नांदेड, मुदखेड, बासर, निजामाबाद मार्गे काचीगुडा येथे रात्री १०.४५ मिनिटांनी पोहोचणार आहे.
शिर्डी जाणाऱ्या भाविकांसाठी सोयीचे
उर्वरित स्थानकाच्या कोणत्याही वेळापत्रकात बदल झालेला नाही. या रेल्वेला तेरा सर्वसाधारण आणि दोन एसएलआर असे एकूण १५ डबे जोडलेले असतील. या रेल्वेमुळे आता मनमाड तसेच शिर्डी जाणाऱ्या भाविकांसाठी सोयीचे होणार आहे.