पद, पगार चांगली; तरी लाचेची हाव वाढली; राज्यात ९७ दिवसांत २१५ लाचेचे गुन्हे दाखल
By राजन मगरुळकर | Updated: April 15, 2025 13:48 IST2025-04-15T13:48:04+5:302025-04-15T13:48:24+5:30
महसूल, भूमिअभिलेख, पोलिस, पंचायत समितीत सर्वाधिक सापळे

पद, पगार चांगली; तरी लाचेची हाव वाढली; राज्यात ९७ दिवसांत २१५ लाचेचे गुन्हे दाखल
परभणी : नवीन वर्षात १ जानेवारी ते ७ एप्रिल या ९७ दिवसांच्या कालावधीत राज्यात लाच प्रकरणात एकूण २१२ सापळा कारवाई झाल्या, तर अपसंपदा प्रकरणात एक आणि अन्य भ्रष्टाचाराच्या दोन गुन्ह्यांची नोंद झाली. एकूण २१५ गुन्ह्यांमध्ये ३१४ लाचखोर आरोपी लोकसेवक अडकले आहेत. या कारवाईत महसूल, भूमिअभिलेख, नोंदणी, पोलिस, पंचायत समिती, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, महापालिका आणि महावितरण विभागातील सापळ्यांचे प्रमाण दुहेरी आकड्यात आहे.
लाच देणे आणि घेणे गुन्हा असल्याचे माहीत असूनही चिरीमिरीचा मोह शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना भारी पडतो. राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विविध पथकांकडून वेळोवेळी लाच प्रकरणात दाखल माहिती आणि अर्ज तक्रारीवर त्वरित गुन्हा नोंद कारवाई केली जाते. यामध्ये अगदी पाचशे रुपयांपासून ते लाखो रुपयांच्या लाचेची प्रकरणे घडल्याचे समोर आले आहे.
वर्षनिहाय सापळ्यांची संख्या (अपसंपदा, भ्रष्टाचारासह)
२०१४ - १३१६
२०१५ - १२७९
२०१६ - १०१६
२०१७ - ९२५
२०१८ - ९३६
२०१९ - ८९१
२०२० - ६६३
२०२१ - ७७३
२०२२ - ७४९
२०२३- ८१२
२०२४ - ७२१
सापळ्यांचा आलेख घटतोय
सन २०१४ ते २०२४ या कालावधीत झालेल्या एकूण सापळा कारवाईमध्ये सातत्याने दरवर्षी लाच प्रकरणातील गुन्ह्यांची नोंद घटल्याचे दिसून येत आहे. विशेषतः सन २०२० मध्ये कोरोना कालावधीत ६६३ सापळा कारवाई झाल्या होत्या. त्यानंतर पुन्हा त्यात शंभर गुन्ह्यांची वाढ झाली.
परीक्षेत्रनिहाय एकूण कारवाई
मुंबई १५
ठाणे २१
पुणे ४०
नाशिक ४५
नागपूर २५
अमरावती १८
छत्रपती संभाजीनगर ३१
नांदेड १७
एकूण सापळे २१२
अपसंंपदा एक
अन्य भ्रष्टाचार दोन
एकूण गुन्हे २१५
एकूण आरोपी ३१४
अशी आहे खातेनिहाय कारवाईची संख्या
महसूल, भूमिअभिलेख, नोंदणी ५६
पोलिस ३१
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. म. १२
महापालिका १०
नगरपरिषद तीन
जिल्हा परिषद १०
पंचायत समिती २५
वनविभाग सहा
सार्वजनिक आरोग्य विभाग १०
शिक्षण विभाग ८
प्रादेशिक परिवहन विभाग पाच
गतवर्षीपेक्षा २४ कारवाई कमी
सन २०२४ मध्ये जानेवारी ते एप्रिल या कालावधीत एकूण २३६ सापळा कारवाई झाल्या होत्या. यामध्ये ३४७ आरोपींचा समावेश होता. यावर्षी झालेल्या याच कालावधीतील सापळ्यांची संख्या २१२ असून, गतवर्षीपेक्षा २४ सापळे कमी झाले आहेत.