ग्रा.पं. निवडणुकीचा अतिवृष्टीच्या अनुदानाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:08 AM2021-01-24T04:08:31+5:302021-01-24T04:08:31+5:30
मागील अनेक वर्षाचे रेकॉर्ड मोडत यावर्षी तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. याचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला. त्यामुळे राज्य शासनाने ...
मागील अनेक वर्षाचे रेकॉर्ड मोडत यावर्षी तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. याचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला. त्यामुळे राज्य शासनाने अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. शासनाने पूर्वी ५० टक्के प्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान वाटप केले. पहिल्या टप्यात उपलब्ध झालेल्या रकमेतून तालुक्यातील ३८ गावातील शेतकऱ्यांचे अनुदान वाटप करण्यात आले. मात्र दुसऱ्या टप्प्यातील अनुदानासाठी निवडणुकांचा अडथळा आला. ग्रा. पं. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्या नंतर निवडणूक आचारसंहिता सुरू झाली. सर्व यंत्रणा निवडणुकीच्या कामाला लागली. याच काळात अतिवृष्टीचे दुसऱ्या टप्यातील १४ कोटी २८ लाख रुपये अनुदान उपलब्ध झाले होते. या काळात अनुदान वाटप प्रक्रिया रखडली गेली. तालुक्यातील २७ गावातील शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू झाली नाही. त्यामुळे २७ गावातील १८ हजार ७२३ शेतकऱ्यांच्या १७ हजार ९४ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ८ कोटी २० लाख ६८ हजार १२० रुपये अनुदान वाटपासाठी महसूल विभागाने प्रक्रिया आता सुरू केली आहे.
तीन गावच्या याद्या तयार होईनात
पाथरी तालुक्यातील झरी सज्जामधील झरी, बोरगव्हाण आणि सिमुरगव्हाण या तीन गावातील शेतकऱ्यांच्या याद्या तहसील कार्यालयात अद्यापही दाखल झाल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.