शेतकऱ्यांचा कापूस घेण्यास ग्रेडरचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:17 AM2021-01-23T04:17:36+5:302021-01-23T04:17:36+5:30
गंगाखेड : शेतकऱ्यांनी वाहनात भरून विक्रीसाठी आणलेला कापूस खरेदी करण्यास ग्रेडरने नकार दिल्याची घटना २२ जानेवारी रोजी पालम रस्त्यावरील ...
गंगाखेड : शेतकऱ्यांनी वाहनात भरून विक्रीसाठी आणलेला कापूस खरेदी करण्यास ग्रेडरने नकार दिल्याची घटना २२ जानेवारी रोजी पालम रस्त्यावरील केशव जिनिंगमध्ये घडली. या शेतकऱ्याने तहसील कार्यालय गाठत तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना निवेदन देऊन आपली कैफीयत मांडली.
गंगाखेड तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील शेतकरी शिवराज भगवान चिलगर यांनी त्यांच्या शेतातील कापूस वाहनात भरून २२ जानेवारी रोजी विक्रीसाठी पालम रस्त्यावरील केशव जिनिंगवर आणला. कापसाच्या वाहनाचे वजन झाल्यानंतर जिनिंगवरील ग्रेडर कदम याने कापूस खराब असल्याचे सांगत खरेदी करण्यास नकार दिला. कापूस परत वाहनात भरुन नेण्याच्या सूचना शेतकरी शिवराज चिलगर यांना दिल्या. यावेळी वारंवार विनंती करूनदेखील ग्रेडरने कापूस खरेदीस नकार दिला. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याने आपला कापूस पिशवीत भरून तहसील कार्यालय गाठून तहसीलदार स्वरूप कंकाळ यांची भेट घेतली. त्यानंतर कापूस खरेदी करण्यास नकार देणाऱ्या ग्रेडरवर कारवाई करून जिनिंगवर कापूस खरेदीचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली. यावेळी सखाराम बोबडे, पंडितराव घरजाळे यांची उपस्थिती होती.