परभणी जिल्ह्यात दिग्गजांनी गड राखले, पण सर्वत्र स्थानिक आघाड्यांचेच वर्चस्व
By राजन मगरुळकर | Published: December 20, 2022 05:31 PM2022-12-20T17:31:12+5:302022-12-20T17:31:44+5:30
स्थानिक नेत्यांनी आपले गड राखले तर काही ठिकाणी नवीन आघाडी तसेच गावातील पॅनल निवडीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले.
परभणी :जिल्ह्यातील ११९ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानाचे निकाल मंगळवारी दुपारी हाती आले. या निकालांमध्ये बहुतांश गावांमध्ये स्थानिक आघाड्यांचे पॅनल विजयी झाल्याचे दिसून येत आहे. यासह विविध पक्षांनी सुद्धा ग्रामपंचायत निकालामध्ये बाजी मारली आहे. मात्र, सर्वाधिक यश स्थानिक आघाड्यांना मिळाल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये ११९ ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झाले. ८५ टक्के मतदान ग्रामपंचायतीसाठी झाल्याने निवडणूक निकालाची सुरस निर्माण झाली होती. मंगळवारी सकाळी दहा वाजता सर्वच तालुक्याच्या तहसीलमध्ये मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. टेबलनिहाय व फेरीनिहाय हळूहळू निकाल हाती येत होते. त्यानुसार पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
स्थानिक नेत्यांनी आपले गड राखले तर काही ठिकाणी नवीन आघाडी तसेच गावातील पॅनल निवडीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. सर्वच पक्षांकडून तसेच स्थानिक प्रमुख नेत्यांकडून वेगवेगळे दावे-प्रति दावे केले जात असल्याने प्रत्यक्ष कोणत्या पक्षाकडे किती ग्रामपंचायती आल्या, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.