चाव्या, शिक्के परत करुन ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 04:21 PM2019-08-22T16:21:24+5:302019-08-22T16:27:17+5:30
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या अंतर्गत परभणी तालुका शाखेने हे आंदोलन सुरु केले आहे.
परभणी- वेतनातील त्रुटी दूर कराव्यात, यासह इतर अनेक मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने गुरुवारी परभणी तालुक्यातील ग्रामसेवकांनी त्यांच्या कपाटच्या चाव्या आणि शिक्के गटविकास अधिकाऱ्यांना परत करुन बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या अंतर्गत परभणी तालुका शाखेने हे आंदोलन सुरु केले आहे. ग्रामसेवकांच्या वेतनातील त्रुटी दूर कराव्यात, ग्रामसेवक पदभरतीसाठी शैक्षणिक अर्हता वाढवावी, प्रवासभत्ता वाढवावा आणि जुनी पेंशन योजना लागू करावी, अशा ग्रामसेवकांच्या मागण्या आहेत. त्या मागण्यांसाठी अनेकवेळा शासनासोबत चर्चा झाली. त्याच प्रमाणे २४ जुलै रोजी प्रशासनाला निवेदन देऊन मागण्या मान्य न झाल्यास २२ आॅगस्टपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र गुरुवारपर्यंत ग्रामसेवकांच्या मागण्यांची शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे २२ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास परभणी तालुक्यातील ग्रामसेवकांनी पंचायत समिती कार्यालय गाठून त्यांच्या कपाट्याच्या चाव्या आणि शिक्के गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांच्याकडे सुपूर्द केले. गुरुवारपासून ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन सुरु केल्याने ग्रामपंचायतींमधील कामकाज ठप्प झाले आहे.
या आंदोलनात संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष जाधव, राहुल ए.पाटील, आनंद खरात, एस.एल.खटींग, डी.बी.लांडे, एस.जी.धरणे, पी.ए.हारकळ, के.पी.गायकवाड, ए.आर.लाडेकर, व्ही.ए.पवार, ज्ञानोबा दुधाटे, के.आर. गव्हाणे आदींनी सहभाग नोंदविला.