राज्यामध्ये महाआघाडी साथ-साथ; जिल्ह्यात राकाँ-सेनेची पाठीला पाठ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:22 AM2021-08-14T04:22:24+5:302021-08-14T04:22:24+5:30
जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. त्यानंतर काँग्रेस व शिवसेनेची ताकद आहे. भारतीय जनता पार्टीची फारशी ...
जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. त्यानंतर काँग्रेस व शिवसेनेची ताकद आहे. भारतीय जनता पार्टीची फारशी ताकद नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांमध्येच आतापर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लढत झाली आहे. त्याचाच प्रत्यय पुन्हा येण्याची शक्यता आहे.
पंचायत समिती
जिल्ह्यातील ९ पैकी ५ पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. तर दोन ठिकाणी शिवसेना व एक पं.स. रासपच्या ताब्यात आहे. राष्ट्रवादीचाच येथे वरचष्मा दिसतो.
जिल्हा परिषद
जि.प.त राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून, काँग्रेस व शिवसेना सत्तेत सहभागी आहे. जि.प.त भाजपाचे ५ सदस्य आहेत. त्यामुळे राकाँचा या निवडणुकीतही स्वबळाकडेच कल असेल.
परभणी महापालिका
परभणी मनपात काँग्रेसची सत्ता आहे तर राष्ट्रवादी विरोधी पक्षात आणि सत्तेत अशा दोन्ही भूमिका निभावत आहे. शिवसेनेपेक्षा भाजपाचे अधिक सदस्य असले तरी दोन्ही पक्ष मनपात प्रभावी नाहीत.
तीन पक्ष, तीन विचार
शिवसेनेत खा. बंडू जाधव व आ. डॉ. राहुल पाटील हे प्रमुख नेते असले तरी या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्या काही दिवसांमध्ये बिनसले आहे. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेची राष्ट्रवादीच्या तुलनेत ताकद कमी आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वाधिक प्रबळ पक्ष असला तरी या पक्षात सध्या मोठ्या प्रमाणात गटबाजी निर्माण झाली आहे. जिंतूर, पाथरी, परभणी व गंगाखेड अशा चार गटांमध्ये हा पक्ष विभागाला आहे. पक्षश्रेष्ठींनी याकडे दुर्लक्ष केले आहे.
काँग्रेसकडे परभणी मनपा व गंगाखेड पालिका या फक्त दोन स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. जिल्हाध्यक्ष आ.सुरेश वरपूडकर यांची या पक्षात एकहाती सत्ता असली तरी पक्ष संघटन वाढलेले नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ठसा उमटविण्याचे पक्षापुढे आव्हान आहे.
पक्षांचे प्रमुख नेते म्हणतात....
पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल, त्यानुसार जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविल्या जातील. या निवडणुकांची स्वबळाची तयारी आम्ही केलेलीच आहे.
-विशाल कदम, शिवसेना जिल्हा प्रमुख
जिल्ह्यात बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यामुळे स्वबळालाच आमचे प्राधान्य राहील. परंतु, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल, तो मान्य राहील.
-राजेश विटेकर, माजी जि.प. अध्यक्ष