वारसदारांच्या खोट्या सह्याकरून नातवांनी राशन दुकान हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 07:31 PM2019-03-09T19:31:22+5:302019-03-09T19:32:13+5:30
आजोबा मृत झाल्यानंतर आरोपींनी वारसदारांच्या नावे खोटी दस्तावेज तयार केली
गंगाखेड (परभणी ) : मृत राशन दुकानदाराच्या वारसदारांच्या खोट्या सह्या करून बनावट दस्ताऐवजा आधारे तालुक्यातील खादगाव येथील राशन दुकान हडपणाऱ्या दोघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने शुक्रवारी मध्यरात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप बालासाहेब फड आणि श्रीनिवास बालासाहेब फड असे आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील खादगाव येथील स्वस्त धान्य दुकान परवानाधारक सोपानराव मानाजी फड यांचे २१ डिसेंबर २०१८ रोजी निधन झाले. मयत सोपानराव फड यांचे नातू दिलीप बालासाहेब फड (रा. यज्ञभुमी परिसर गंगाखेड) व श्रीनिवास बालासाहेब फड ( रा. खादगाव ता. गंगाखेड ) यांनी संगनमत करून सोपानराव यांच्या पश्चात असलेल्या वारसांच्या खोट्या सह्या करून खोटी दस्तावेज तयार केली. तसेच तहसील कार्यालयामार्फत जिल्हा पुरवठा यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला. यानंतर एका आठवड्याच्या आत सर्व कार्यालयीन कार्यवाही पूर्ण करून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून स्वस्त धान्य दुकानाचा परवाना मिळवला. यातून मृताच्या वारसदरांचे पुष्पादेवी राम मुंडे रा. अरबुजवाडी ता. गंगाखेड, अशोक सोपानराव फड रा. खादगाव ता. गंगाखेड यांची व शासनाची फसवणूक केली.
ही बाब उघडकीस आल्यानंतर दिलीप फड यांनी स्वस्त धान्य दुकानाचे प्रकरण दाबून टाकण्याच्या उद्देशाने फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पुष्पादेवी राम मुंडे व अशोक सोपानराव फड यांनी प्रथम पोलीस ठाण्यात व त्यानंतर न्यायालयात दाखल केली. न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून ८ मार्च शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास दिलीप फड व श्रीनिवास फड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश राठोड हे करीत आहेत.