परभणीतील केवळ २४ लाभार्थ्यांनाच अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:39 AM2019-02-04T00:39:43+5:302019-02-04T00:41:01+5:30
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांचे बांधकाम करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या योजनेंतर्गत परभणी शहरातील केवळ २४ लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रती लाभार्थी ४० हजार रुपयांचे अनुदान जमा झाले आहे़ त्यामुळे घरकूल बांधकामांमध्ये अडथळे निर्माण होत असून, या योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना अनुदान वितरित करावे, अशी मागणी होत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांचे बांधकाम करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या योजनेंतर्गत परभणी शहरातील केवळ २४ लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रती लाभार्थी ४० हजार रुपयांचे अनुदान जमा झाले आहे़ त्यामुळे घरकूल बांधकामांमध्ये अडथळे निर्माण होत असून, या योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना अनुदान वितरित करावे, अशी मागणी होत आहे़
सर्वांसाठी घरे ही संकल्पना राबवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी सुरू केली़ या योजनेंतर्गत शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना घरकूल बांधकामासाठी शासनाकडून निधी वितरित केला जातो़ परभणी महापालिकेच्या अंतर्गत ११ हजार २८६ लाभार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत़ महानगरपालिकेने टप्प्या टप्प्याने या अर्जांना मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू केली असून, आतापर्यंत ५०० लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे़ या प्रस्तावांपैकी ८८ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष बांधकामाची परवानगी देण्यात आली असून, ४५ लाभार्थ्यांनी बांधकामही सुरू केले आहे़ या योजनेंतर्गत महापालिकेला २ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे़ मंजूर आणि बांधकाम परवानगी दिलेल्या ८८ लाभार्थ्यांपैकी केवळ २४ लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रती लाभार्थी ४० हजार रुपये या प्रमाणे ९ लाख ६० हजार रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे़
उर्वरित लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे अनुदान मिळाले नसल्याने बांधकाम करताना आर्थिक अडचण भेडसावत आहे़ काही दिवसांपूर्वी अनुदानाच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी आंदोलनही केले होते़ निधी उपलब्ध असतानाही अनुदानाची रक्कम वितरित करताना आखडता हात घेतला जात असल्याने योजनेच्या अंमलबजावणी विलंब लागत आहे़ ंजिल्ह्यात वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत आधीच बांधकामे करण्यासाठी उदासिनता असून, त्यात मनपाचे अनुदानही मिळत नसल्याने लाभार्थ्यांत उदासिनता आहे. महापालिका प्रशासनाने या योजनेला गती देण्यासाठी प्राप्त अर्जांना तातडीने मंजुरी द्यावी तसेच बांधकाम परवानगी दिलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग करावी, अशी मागणी होत आहे़
११ हजार नागरिकांनी केले अर्ज
प्रधानमंत्री घरकूल योजनेंतर्गत लाभ मिळावा यासाठी महापालिकेकडे ११ हजार २८६ जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत़ यापैकी जमिनीची साधन संपत्ती म्हणून वापर करून तेथेच पुनर्विकास करण्यासाठी ८ हजार ४७७ जणांनी अर्ज केले आहेत़ तसेच कर्ज सलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न घटकासाठी परवडणाऱ्या घराची निर्मिती करण्यासाठी ४२८ जणांनी अर्ज केले आहेत़ शासकीय व खाजगी भागीदारीद्वारे आर्थिक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी स्वस्त घरांची निर्मिती करण्यासाठी १ हजार ४२० अर्ज प्राप्त झाले आहेत़ तर आर्थिक दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांद्वारे व्यक्तीगत स्वरुपातील घरकूल बांधण्यासाठी ९६१ जणांनी अर्ज केले आहेत़
योजनेला मिळेना गती
महानगरपालिकेने ११ हजार अर्जांमधून ५०० अर्जांना घरकूल बांधकामासाठी प्रत्यक्षात मंजुरी दिली आहे़ परंतु, त्या पुढील प्रक्रिया संथगतीने सुरू आहे़ मंजूर केलेल्या अर्जांना तातडीने बांधकाम परवानगी आणि अनुदानाचा लाभ दिला तर या योजनेला गती मिळू शकते़ मंजूर अर्जांपैकी केवळ ८८ लाभार्थ्यांनाच बांधकाम परवानगी देण्यात आली असून, त्यातीलही ४५ जणांनी बांधकाम सुरू केले आहे़ ही आकडेवारी पाहता योजनेचे काम संथगतीने सुरू असल्याचे दिसत आहे़ या योजनेला गती देण्यासाठी मनपा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे़