ग्रासरूट इनोव्हेटर : शेतकरी स्त्रियांसाठी कोट, फिंगरगार्डची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:28 PM2018-11-27T12:28:18+5:302018-11-27T12:29:34+5:30
ग्रासरूट इनोव्हेटर : या दोन्ही साधनांचा वापर करून वेचणी, निंदणी केल्यास श्रम आणि वेळेची बचत होणार आहे.
- प्रसाद आर्वीकर (परभणी)
शेतात काम करणाऱ्या महिलांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयातील संशोधकांनी शेतकरी महिलांसाठी विशिष्ट असा कोट आणि फिंगरगार्डही बनविले आहे. या दोन्ही साधनांचा वापर करून वेचणी, निंदणी केल्यास श्रम आणि वेळेची बचत होणार आहे.
शेती हंगामामध्ये कापूस वेचणीचे काम मुख्यत्वे महिलांनाच करावे लागते. यासाठी महिला सर्वसाधारणपणे एक झोळी हातात घेतात. तसेच तोंडाला कपडा बांधून तोडणी करतात, अशा पद्धतीने कापसाची वेचणी करताना महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. शिवाय कापसाच्या पराट्यांमुळे हातांना इजाही होते. ही बाब लक्षात घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयातील वरिष्ठ संशोधक डॉ. जयश्री झेंड व त्यांच्या पथकाने शेतकरी महिलांसाठी विशिष्ट असा कोट तयार केला आहे.
संपूर्ण लांब बाह्यांचा हा कोट असून त्याला एक पिशवी जोडली आहे. या पिशवीला खालील बाजूने बंद बांधण्यात आले आहेत. त्यामुळे पाच किलो कापूस या पिशवीत साठविता येतो आणि काम पूर्ण झाल्यानंतर पिशवीचे बंद सैल केल्यास कापूस खाली टाकला जातो. हा कोट महिला शेतकऱ्यांसाठी आरामदायक काम करण्यासाठी सोयीचा ठरत आहे. तसेच कापसाची वेचणी करीत असताना व भेंडी तोडताना उपयुक्त असे फिंगरगार्डही संशोधकांनी तयार केले आहेत. अॅल्युमिनियमपासून बनविलेले हे फिंगरगार्ड वापरून कापसाची वेचणी केल्यास हातांना इजा होत नाही. भेंडी तोडताना त्यातील चिकट द्राव हातांना लागत नाही. फिंगरगार्डमुळे आरामदायक कामे करता येतात, असे डॉ. जयश्री झेंड यांंनी सांगितले.