ग्रासरूट इनोव्हेटर : नाविन्यपूर्ण बॅगमुळे फुलांची तोडणी आणि साठवणीचा त्रास झाला कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:09 PM2018-12-27T12:09:48+5:302018-12-27T12:10:33+5:30
ग्रासरूट इनोव्हेटर : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केली फुलशेतीसाठी उपयुक्त बॅग
- प्रसाद आर्वीकर ( परभणी)
फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील गृह विज्ञान महाविद्यालयाच्या संशोधकांनी उपयुक्त अशी बॅग विकसित केली आहे़
राज्यामध्ये फुलशेतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दसरा, दिवाळी या सणोत्सवासाठी झेंडूची फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, तर व्हॅलेंटाईन डेला सर्वाधिक गुलाब फुले विक्री होतात. यानुसारच अनेक शेतकरी आता फुलशेतीचे नियोजन करीत आहेत, तर असे काही शेतकरी आहेत ज्यांच्याकडे बारोमास फुलशेती केली जाते. परभणी जिल्ह्यामध्ये वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची शेती केली जाते.
फुले तोडताना महिला शेतकऱ्यांना साठवणूक करताना मोठा त्रास सहन करावा लागतो. कमी कालावधीत फुले तोडून ती बाजारात आणावी लागतात
हा त्रास कमी करण्यासाठी विद्यापीठाच्या गृहविज्ञान महाविद्यालयातील संशोधकांनी उपयुक्त अशी बॅग तयार केली असल्याची माहिती वरिष्ठ संशोधक डॉ़ जयश्री झेंड यांनी दिली़ ही बॅग कार्पोलियन कापडाचा वापर करून तयार करण्यात आली आहे़ बॅग अडकवून दोन्ही हाताने फुले तोडता येतात़ तसेच या बॅगला खालील बाजूने उघडण्याचीही सुविधा केल्याने जमा केलेली फुले एकाच वेळी पोत्यात साठवता येतात़
अशाच पद्धतीने गुलाबाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही बॅग बनविण्यात आली आहे़ ही बॅग कॉटन ताडपत्रीपासून तयार केली असून, गुलाबाच्या काट्यांचा त्रास पाठीला होत नाही़ विशिष्ट पद्धतीने आणि शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन या दोन्ही प्रकारच्या बॅग बनविल्याचे त्यांनी सांगितले़ अष्टूरची फुले तोडण्यासाठीही छोटी बॅग तयार केली आहे. या बॅग शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहेत.