ग्रासरूट इनोव्हेटर : रिव्हॉल्व्हिंग स्टॅण्ड आणि स्टूलच्या मदतीने दूध काढणे झाले सोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:33 PM2018-12-14T13:33:20+5:302018-12-14T13:35:13+5:30
ग्रासरूट इनोव्हेटर : दूध व्यावसायिक, शेतकऱ्यांसाठी दूध काढणे म्हणजे एक दिव्य असते.
- प्रसाद आर्वीकर (परभणी)
दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुलभतेने जनावरांचे दूध काढता यावे, यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संशोधकांनी रिव्हॉल्व्हिंग स्टॅण्ड आणि स्टूल तयार केला आहे.
दूध व्यावसायिक, शेतकऱ्यांसाठी दूध काढणे म्हणजे एक दिव्य असते. गाय किंवा म्हैस जर लाथ मारणारी असेल, तर अनेक वेळा दुधाचे भांडे लाथेने लवंडले जाऊन संपूर्ण दूध वाया जाण्याची भीती जास्त राहते. तसेच दूध काढताना भांडे ठेवण्यासाठीही मोठी गैरसोय निर्माण होत असते. दोन्ही पायांमध्ये बकेट अथवा एखादे भांडे पकडून दूध काढावे लागते. त्यामुळे दूध काढताना अनेक वेळा त्रास होतो. बसण्यासाठीही सोईस्कर साधन नसल्याने दोन पायांवर बसून दूध काढावे लागत असल्याने शारीरिक त्रास सहन करावा लागतो. दूध काढतानाचा होणारा हा त्रास लक्षात घेऊन येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या गृहविज्ञान महाविद्यालयातील संशोधकांनी रिव्हॉल्व्हिंग स्टॅण्ड आणि स्टूल तयार केला आहे, वरिष्ठ संशोधक डॉ. जयश्री झेंड यांनी ही माहिती दिली.
दूध काढण्याच्या पद्धतीचा बारकाईने अभ्यास करून हे स्टॅण्ड बनविण्यात आले आहे. या स्टॅण्डमध्ये बकेट, घागर, दुधाची बरणी ठेवता येते, तसेच सोईस्कर असा स्टूल तयार केला असून, यावर बसून अगदी आरामदायक पद्धतीने दूध काढता येते. विशेष म्हणजे जनावराने कितीही हालचाल केली तरी दुधाची बकेट खाली पडत नाही, तसेच दूध काढताना लाथ लागत नाही.
डॉ. जयश्री झेंड यांनी सांगितले, दूध काढण्याच्या पारंपरिक पद्धतीमुळे अनेक वेळा हृदयाचे ठोके वाढतात, पाठीचा त्रासही जाणवतो; परंतु रिव्हॉल्व्हिंग स्टॅण्डमुळे हा त्रास जाणवत नाही. त्यामुळे दूध उत्पादकांकडून या स्टॅण्डला मागणी वाढत आहे.