परभणी येथे सैन्य भरतीसाठी ४० हजार युवकांनी दिली मैदानी चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 01:51 PM2020-01-14T13:51:06+5:302020-01-14T14:02:25+5:30
चार हजार युवक वैद्यकीय चाचणीसाठी ठरले पात्र
परभणी : येथे पार पडलेल्या सैन्य भरतीमध्ये राज्यातील ९ जिल्ह्यांमधील ४० हजार ५०० युवकांनी मैदानी चाचणी दिली असून, या चाचणी परीक्षेतून साधारणत: ४ हजार युवक वैद्यकीय चाचणीसाठी पात्र ठरल्याची माहिती सैन्य भरतीचे संचालक कर्नल तरुण जामवाल यांनी दिली़
परभणीत ४ जानेवारीपासून भारतीय सैन्य दलातील सोल्जर टेक, सोल्जर जीडी आणि ट्रेडस््मन या तीन पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली़ येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर ९ दिवस चाललेल्या या प्रक्रियेत सुमारे ४० हजार ५०० युवकांनी प्रत्यक्ष शारीरिक चाचणीमध्ये सहभाग नोंदविला असून, त्यातून ४ हजार युवक वैद्यकीय चाचणीसाठी पात्र ठरले आहेत़ वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरच या युवकांना औरंगाबाद येथे २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी बोलावले जाणार असल्याची माहिती कर्नल जामवाल यांनी दिली़