परभणी जिल्ह्यात दीड मीटरने वाढली भूजल पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 04:59 PM2019-11-27T16:59:22+5:302019-11-27T17:01:52+5:30

जिल्ह्यात परतीचा पाऊस झाला़ या पावसाने भूजल पातळीमध्ये लक्षणीय वाढ

Ground water level increased by one and a half meters in Parbhani district | परभणी जिल्ह्यात दीड मीटरने वाढली भूजल पातळी

परभणी जिल्ह्यात दीड मीटरने वाढली भूजल पातळी

Next
ठळक मुद्देयावर्षी जिल्ह्यामध्ये दोन टप्प्यात पाऊस झाला़ परतीच्या पावसानंतर लक्षणीय वाढ

परभणी : येथील भूजल सर्वेक्षण विभागाने सप्टेंबर महिन्यात घेतलेल्या अहवालानुसार सरासरी भूजल पातळीच्या तुलनेत या महिन्यात १़५८ मीटरने भूजल पातळीत वाढ झाली आहे़ आॅक्टोबर महिन्यामध्ये जिल्ह्यात परतीचा पाऊस झाला़ या पावसाने भूजल पातळीमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, या पातळीची नोंद घेण्याचे काम आता या विभागाने हाती घेतले आहे़ 

यावर्षी जिल्ह्यामध्ये दोन टप्प्यात पाऊस झाला़ सुरुवातीच्या काळात झालेला पाऊस समाधानकारक नसला तरी पिकांना तारणारा ठरला होता़ या पावसाने जिल्ह्यातील सरासरी गाठली नाही़ त्यामुळे भूजल पातळीतही मोठी वाढ झाली नव्हती़ परंतु, आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आणि या पावसामुळे सर्वच तालुक्यांत भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे़ भूजल सर्वेक्षण विभाग प्रत्येक तीन महिन्यांनी जिल्ह्यातील भूजल पातळीची नोंद घेतो़ 

सप्टेंबर महिन्यात या विभागाने भूजल पातळीची नोंद घेतली आहे़ त्यात सेलू तालुका वगळता इतर सर्वच तालुक्यांमध्ये परतीच्या पावसापूर्वीच भूजल पातळीत वाढ दर्शविण्यात आली आहे़ परभणी तालुक्यात सप्टेंबर महिन्यामध्ये भूजल पातळी सरासरी ८़३२ मीटरवर असते़ यावर्षी ती ६़५९ मीटरवर पोहचली़ त्यामुळे १़७३ मीटर पाणी पातळी वाढल्याची नोंद या विभागाने घेतली आहे़ पूर्णा तालुक्यात सरासरी ३़८८ मीटर असणारी भूजल पातळी १़४७ मीटरवर आली़ पाथरी तालुक्यात ७़२५ मीटरवर असणारी भूजल पातळी ५़५९ मीटरवर आली़ 

सेलू तालुक्यात मात्र सरासरी ८़१३ मीटरवर भूजल पातळी राहते़ ती यावर्षी १०़२३ मीटरवर पोहोचली आहे़ मानवत तालुक्यात सरासरी ४़६७ मीटरपर्यंत भूजल पातळी राहते़ यावर्षीच्या नोंदीत ही पातळी ३़८३ मीटरवर पोहोचली़ गंगाखेड तालुक्यात ६़७७ मीटरवर, पालम तालुक्यात ३़१७ मीटरवर, सोनपेठ ४़५४ तर जिंतूर तालुक्यामध्ये ५़४४ मीटरवर भूजल पातळी असल्याची नोंद घेण्यात आली आहे़ भूजल सर्वेक्षण विभागाने घेतलेल्या या नोंदीत जिंतूर आणि सेलू या दोन तालुक्यांत सरासरी पातळीच्या तुलनेत यावर्षी घट दर्शविण्यात आली आहे़ एकंदर भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाल्याने उन्हाळ्यातील पाणीटंचाईची चिंता दूर झाली आहे़ 

नव्याने नोंदी घेण्याचे काम सुरू
भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी आॅक्टोबर महिन्यातही भूजल पातळीची नोंद घेतली जाते़ यावर्षी याच महिन्यात परतीचा पाऊस बरसला़ सर्वदूर आणि अतिवृष्टीची नोंद घेणारा हा पाऊस झाला असून, या पावसामुळे भूजल पातळीत मोठी वाढ झाली आहे़ मात्र या नोंदी आॅक्टोबर महिन्यातच घेतल्या असत्या तर त्यात कमी अधिक प्रमाण झाले असते़ ४त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात वाढलेल्या भूजल पातळीची नोंद घेण्याचे काम या विभागाने आता सुरू केले असून, या नोंदी आॅक्टोबर महिन्यातील भूजल पातळीच्या असल्याचे ग्राह्य धरले जाणार आहे़ त्यामुळे सद्यस्थितीला उपलब्ध असलेल्या आकडेवारीपेक्षाही अधिक वाढ होण्याची चिन्हे आहेत़ 

पूर्णा तालुक्यात  सर्वाधिक वाढ
सप्टेंबर महिन्यामध्ये भूजल सर्वेक्षण विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार पूर्णा तालुक्यामध्ये सर्वाधिक २़४१ मीटरने भूजल पातळी वाढली आहे़ तर परभणी तालुक्यात १़७३ मीटर, पाथरी १़६६ मीटर, मानवत ०़८४ मीटर, गंगाखेड १़५१ मीटर, पालम ०़९६ मीटर आणि सोनपेठ तालुक्यामध्ये १़९६ मीटरने भूजल पातळीत वाढ        दर्शविण्यात आली आहे तर सेलू तालुक्यामध्ये सरासरी पातळीपेक्षाही २़१० मीटरने पातळीत घट झाली आहे़ त्याच प्रमाणे जिंतूर तालुक्यात ०़२३ मीटरची घट सप्टेंबर महिन्यात दर्शविण्यात आली आहे़ आॅक्टोबर महिन्यामध्ये या दोन्ही तालुक्यांतील भूजल पातळीतही वाढ झाली आहे़ 

Web Title: Ground water level increased by one and a half meters in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.