अतिवृष्टीतील नुकसानीचे पंचानामे करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:24 AM2021-09-10T04:24:54+5:302021-09-10T04:24:54+5:30
जिल्ह्याच नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अनुषंगाने पालकमंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी ...
जिल्ह्याच नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अनुषंगाने पालकमंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत. त्यानंतर याबाबतचा अहवाल राज्य शासनाला तातडीने सादर करावा, तसेच मागील १५ दिवसांपूर्वी जी अतिवृष्टी झाली, त्यावेळी शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती मोबाइल ॲपद्वारे रिलायन्स या जिल्ह्यासाठीच्या विमा कंपनीला देण्याचा प्रयत्न केला; परंतु अतिवृष्टीमुळे नेटवर्क जाम असल्याने, तसेच बहुतांश शेतकऱ्यांनी एकदाच ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात केल्याने सदरील कंपनीचे सर्व्हर डाऊन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना तक्रारी नोंदविताना अडचणी आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज ऑफलाइन घेण्यात यावेत, तसेच ज्या महसूल मंडळात ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, तेथील शेतकऱ्यांच्या बाधांवर जाऊन पंचनामे करावेत. अतिवृष्टमुळे ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे, तसेच जनावरे दगावली आहेत, त्यांना तातडीने आर्थिक मदत करावी, तसेच रस्त्यांचे नुकसान, विजेचे खांब पडणे याबाबतचाही अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्री मलिक यांनी दिले आहेत. मंत्रालयातील बैठकीस आमदार सुरेश वरपूडकर, माजी आमदार विजय भांबळे, तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आंचल गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिप सीईओ शिवानंद टाकसाळे, कृषी, बांधकाम आदी विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.