शेत आखाड्यावरील देशी दारूसह गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:18 AM2021-01-20T04:18:10+5:302021-01-20T04:18:10+5:30
गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव येथील व्यापाऱ्याने चोरटी विक्री करण्यासाठी त्याच्या शेत आखाड्यावर प्रतिबंधित गुटखा व देशी दारूचा साठा ठेवल्याची गोपनीय ...
गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव येथील व्यापाऱ्याने चोरटी विक्री करण्यासाठी त्याच्या शेत आखाड्यावर प्रतिबंधित गुटखा व देशी दारूचा साठा ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्याने १८ जानेवारी रोजी दुपारी २:२० च्या सुमारास विशेष पथकाने छापा टाकला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, पो. ना. भुजबळ, केंद्रे, भिसे आदींसह पिंपळदरी पोलीस ठाण्यातील पो. ना. सचिन भदर्गे, पो.शि. माणिक वाघ, होमगार्ड मुंडे आदींच्या पथकाने मरडसगाव फाटा ते गोपा या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चिंतामणी उत्तमराव काळे यांच्या शेत आखाड्यावर धाड टाकली. यामध्ये गुटखा व त्यात मिसळण्यासाठी असलेल्या जर्दाचे प्रत्येकी पाच प्रमाणे दहा पोती किंमत अंदाजे ३२ हजार ५०० रुपये व २ हजार ४९६ रुपयांची संत्रा भिंगरीचे लेबल असलेली देशी दारू असा एकूण ३४ हजार ९९६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस शिपाई माणिक वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिंतामणी उत्तमराव काळे (रा. मरडसगाव ता. गंगाखेड) याच्याविरुद्ध सोमवार रोजी रात्री उशिराने पिंपळदरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कानगुले हे करीत आहेत.