किराणा दुकानातून गुटख्याची विक्री; सेलूत दोन ठिकाणाहून मोठा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 01:18 PM2020-03-04T13:18:42+5:302020-03-04T13:21:49+5:30
सेलू तालुक्यातील वालूरमध्ये गुटखा पकडला
परभणी : सेलू तालुक्यातील वालूर येथील दोन किराणा दुकानतून ८४ हजार ५५० रुपयांचा गुटखा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री जप्त केला आहे.
पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकातील कर्मचारी ४ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वालूर परिसरात गस्त घालत असताना बसस्थानकाजवळील दोन किराणा दुकानांमध्ये गुटख्याचा साठा असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यावरून ममता किराणा दुकान आणि हरिओम किराणा दुकानावर छापा टाकण्यात आला. ममता किराणा दुकानामध्ये १३ हजार रुपयांचा गोवा गुटखा तसेच १३०० रूपयांचा वजीर गुटखा जप्त करण्यात आला. तसेच गुटख्याची विक्री करून जमा झालेले १२ हजार १३९ रुपये आणि एक हजार रुपयांचा मोबाईल असा २७ हजार ४३० रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. याच भागात असलेल्या हरिओम किराणा दुकानाची पंचासमक्ष तपासणी केली असता या दुकानांमध्ये ५ हजार २५० रुपये किमतीचा गोवा गुटखा तसेच ६५ हजार रुपये किमतीचे गोवा गुटख्याचे ५ पोते दुकान मालक हरिश रेवणवार यांच्या घरातून जप्त करण्यात आले आहेत.
या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी प्रतिबंधित असलेला ८४ हजार ५५० रुपयांचा गुटखा, रोख १२ हजार १३0 रुपये आणि एक मोबाईल, असा ९७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दुकान मालक शेख अतीक शेख इर्शाद आणि हरीश विजयकुमार रेवणवार या दोघांविरुद्ध सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक एच.डी.पांचाळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक हनुमान कच्छवे, एस.व्ही. घनसावंत, चव्हाण, पी.बी. भोरगे यांच्या पथकाने केली.