पोलिसांनी नष्ट केला ७६ लाखांचा गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:17 AM2021-03-18T04:17:07+5:302021-03-18T04:17:07+5:30
राज्यात गुटखा विक्रीला बंदी असताना, अनधिकृतपणे गुटख्याचा साठा करून, त्याची विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी आतापर्यंत विविध कारवाया करीत गुन्हे दाखल ...
राज्यात गुटखा विक्रीला बंदी असताना, अनधिकृतपणे गुटख्याचा साठा करून, त्याची विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी आतापर्यंत विविध कारवाया करीत गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला गुटका पोलीस ठाण्यात आवारातच साठा करून ठेवला होता. न्यायालयाच्या निर्णयानुसार, गुटखा नष्ट करण्याची कारवाई केली जाते. मागील १८ वर्षांपासून साठविलेला गुटखा नष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, शहरातील दोन पोलीस ठाण्यांनी ही कारवाई केली आहे.
शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यांमध्ये २००२ पासून दाखल असलेल्या १६ गुन्ह्यांमध्ये १० लाख ८२ हजार ४३४ रुपयांचा गुटखा साठविला होता. पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या आवारात हा गुटखा जाळून नष्ट करण्यात आला. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे अन्नसुरक्षा अधिकारी कच्छवे यांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे, नानलपेठ पोलीस ठाण्यात १८ गुन्ह्यांमध्ये ६५ लाख २३ हजार ९६८ रुपयांचा गुटखा जप्त केला होता. सुमारे दोन ट्रक गुटखा महानगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंड नेऊन जाळून नष्ट करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, तसेच अन्नसुरक्षा अधिकारी कच्छवे यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांमध्ये अवैध गुटखा विक्रीविरुद्ध कारवाया केल्या जातात. या कारवायांमध्ये जप्त केलेला गुटखा ठाण्यांच्या परिसरातच साठवून ठेवला जातो. न्यायालयाने हा गुटखा नष्ट करण्याचे आदेश दिल्याने गुटखा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पाथरी आणि सोनपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुटखा १६ मार्च रोजी जाळून नष्ट करण्यात आला होता. १७ मार्च रोजी शहरातील नवा मोंढा आणि नानलपेठ पोलीस ठाण्याने हा गुटखा नष्ट केला आहे.