साडेपाच लाखांचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:25 AM2021-02-23T04:25:47+5:302021-02-23T04:25:47+5:30
२१ फेब्रुवारी रोजी सिरसाळा येथून पाथरीकडे एका कारने गुटखा घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे कारवाई ...
२१ फेब्रुवारी रोजी सिरसाळा येथून पाथरीकडे एका कारने गुटखा घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे कारवाई करणारे पोलीस कर्मचारी बाभळगाव येथे कारवाईसाठी दबा धरून बसले. ही गाडी अडविण्यासाठी बाभळगाव रस्त्यावर रिकाम्या उसाचा आडवा ट्रॅक्टर लावण्यात आला. मात्र कार (एमएच १२ एनबी ४५७५) चालकाला बाभळगाव येथे पोलीस असल्याचे समजताच त्याने बाभळगाव गावातून गाडी सारोळा-केकरजवळा रस्त्याने सुसाट वेगाने नेली. पोलिसांनी या गाडीचा पाठलाग सुरू केला. सारोळा शिवारात कॅनलच्या चारीत गाडी फसली गेली. गाडी जागेवर सोडून गाडीतील तीन आरोपी फरार झाले. अवैध गुटखा विक्री करणारा सराईत माधव नवले यास पोलिसांनी फोन करून थांबण्याचा इशारा केला. मात्र तो इतर साथीदारांसह पळून गेला. या कारवाईत पोलिसांनी गाडीच्या मागच्या सीटवर पोत्यात बांधलेला गुटखा, पान मसाला आणि तंबाखू असा माल जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी पाथरी येथील पंचायत समितीच्या काॅम्प्लेक्समध्ये एका दुकानावर याच टोळीतील लोकांनी गुटखा लपवला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पहाटे ४ वाजेच्या सुमारास दुकान गाठले. तेव्हा बळीराम नवले पोलिसांना पाहताच पळून जाऊ लागला. त्यास पोलिसांनी गुटख्यासह ताब्यात घेतले. या दोन्ही कारवाईत ३ लाख ५ हजार ६३० रुपयांचा गुटखा तसेच २ लाख ५० हजार रुपायांची कार असा ५ लाख ५५ हजार ६३० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी पाथरी येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत राऊत यांच्या फिर्यादीवरून बळीराम रामचंद्र नवले, माधव नवले (रा. फुलारवाडी) आणि इतर ३ अशा ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज अहिरे हे करत आहेत.
पथकात या कर्मचाऱ्यांचा समावेश
परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक अलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, पोलीस उपनिरीक्षक खोले, पोलीस कर्मचारी सुग्रीव केंद्रे, नीलेश भुजबळ, शंकर गायकवाड, संतोष सानप, यशवंत वाघमारे, विष्णू भिसे, जहर पटेल, दीपक मुदिराज, सुधीर काळे आदींचा समावेश होता.