थकीत वेतनासाठी मनपासमोर सफाई कामगार, कर्मचाऱ्यांचे ‘हलगी बजाव’ आंदोलन
By राजन मगरुळकर | Published: October 18, 2023 07:03 PM2023-10-18T19:03:07+5:302023-10-18T19:03:21+5:30
परभणी शहर महापालिका सफाई कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने महापालिका कार्यालयासमोर दररोज दुपारी दोन तास प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले जात आहे.
परभणी : शहर मनपाच्या कार्यालयासमोर सफाई कामगार आणि कर्मचारी संघटनेच्या वतीने थकीत वेतनाच्या मागणीसाठी बुधवारी दुपारी महापालिका कार्यालयात ‘हलगी बजाव’ आंदोलन करण्यात आले. परभणी शहर महापालिका सफाई कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने महापालिका कार्यालयासमोर दररोज दुपारी दोन तास प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले जात आहे.
यामध्ये बुधवारी थकीत वेतनाच्या मागणीसाठी हलगी बजाव, बोंब मारो आंदोलन करून, मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केले की, मनपा स्वच्छता कामगार आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे तीन ते चार महिन्यांचे थकीत वेतन आणि सोबतच डीए आणि वार्षिक वेतनवाढ तत्काळ देण्यात यावी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सेवेत कायम करण्यात यावे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची थकीत बाकी तत्काळ अदा करण्यात यावी, सफाई कामगारांना शैक्षणिक पात्रतेनुसार कामाचा अनुभव लक्षात घेता मुकादम, शिपाई, लिपिक, वाहन चालक, स्वच्छता निरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात यावी, सफाई कामगारांची वैद्यकीय रजा बिन पगारी केलेली रजा पगारी करून ती तत्काळ अदा करण्यात यावी, यासह अन्य मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. निवेदनावर संघटना अध्यक्ष अनुसयाबाई जोगदंड, सचिव के.के. भारसाखळे आदींसह स्वछता कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आंदोलनात मनपा स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.