हमालाच्या मुलाचा 'भीम पराक्रम'; अंडर-१९ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कोरले सुवर्णपदकावर नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 14:55 IST2025-01-31T14:54:33+5:302025-01-31T14:55:07+5:30

मार्च-एप्रिलमध्ये बँकॉक येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे, हे विशेष.

Hamala's son beats everyone; wins gold medal in U-19 National Wrestling Championship | हमालाच्या मुलाचा 'भीम पराक्रम'; अंडर-१९ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कोरले सुवर्णपदकावर नाव

हमालाच्या मुलाचा 'भीम पराक्रम'; अंडर-१९ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कोरले सुवर्णपदकावर नाव

गंगाखेड (परभणी) : प्रयत्न, जिद्द, कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर यश कोणत्याही क्षेत्रात मिळविता येते. त्यास परिस्थितीला दोष दिला जात नाही. ग्रिको रोमन रेसलिंग चॅम्पियनशिपचा बहुमान मिळविलेल्या चंद्रकांत याने यातून हे सिद्ध केले. नुकत्याच मडगाव (गोवा) येथे झालेल्या ग्रिको रोमन रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये १९ वर्षाखालील व ८२ किलो वजनगटात तालुक्यातील खोकलेवाडी येथील हमाली कामातून मोलमजुरी करणाऱ्या गणपत बिडगर यांच्या चंद्रकांत या मुलाने थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. मार्च-एप्रिलमध्ये बँकॉक येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे, हे विशेष.

२५ व २६ जानेवारीदरम्यान मडगाव (गोवा) येथे ग्रिको रोमन रेसलिंग चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील वयोगट १९ वर्षाखालील व ८२ किलो वजनगटात सुवर्णपदक पटकविण्याचा 'भीम पराक्रम' तालुक्यातील चंद्रकांत गणपत बिडगर या युवा कुस्तीपटूने केला आहे.

सुवर्णपदकाचा मानकरी चंद्रकांत यांचे वडील गणपतराव हे कौटुंबिक उदरनिर्वाहासाठी आळंदी, पुणे येथे हमाली व मोलमजुरी करून कुटुंबाचा प्रपंच चालवतात. कष्टकऱ्यांच्या घरी जन्म घेऊन राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीचा 'गोल्ड मेडल'चा मान पटकाविलेल्या चद्रकात यांच्या कामगिरीने गंगाखेड तालुकावासीयांची मान गर्वाने उंचावली आहे. राष्ट्रीय गोल्ड मेडलिस्ट ठरलेल्या चंद्रकांतची बहीण मोनिका हीसुद्धा राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू आहे. मोनिका व चंद्रकांत या युवा कुस्तीपटूंच्या गुणवत्तेला शासन-प्रशासनस्तरावर यथोचित सन्मान होण्याची अपेक्षा तालुकावासीय व्यक्त करीत आहेत.

भरीव मदतीची नितांत गरज
आळंदी येथे मी उदरनिर्वाहासाठी बिघारीचे काम करतो. ४०० ते ५०० रुपये मजुरी असते. तीन मुलांचे शिक्षण हाताबाहेर होत आहे. त्यातच चंद्रकांत हा मोठा पैलवान झाला. त्याला लागणारी माझी आर्थिक मदत खूप छोटी पडत आहे. परिणामी समाज, लोकप्रतिनिधी व शासनाकडून भरीव मदतीची नितांत गरज आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार करणे माझ्या ऐपतीच्या बाहेर आहे हे कटू वास्तव आहे.
- गणपत बिडगर, वडील

गोल्ड मेडल वडिलांना समर्पित
परिस्थितीच्या बाहेर जाऊन मी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू व्हावे, यासाठी माझे वडील ज्या पद्धतीने अतोनात शारीरिक श्रम करत आहेत, हे मी कधीच विसरू शकत नाही. परिणामी माझे हे गोल्ड मेडल मी वडिलांना समर्पित करतो.
- चंद्रकांत बिडगर, कुस्तीपटू

Web Title: Hamala's son beats everyone; wins gold medal in U-19 National Wrestling Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.