ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीत हामरातुमरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:49 AM2021-02-20T04:49:20+5:302021-02-20T04:49:20+5:30

वालूर ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाची तसेच सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या १७ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीला गावाच्या ...

Hamratumari in the first meeting of the Gram Panchayat | ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीत हामरातुमरी

ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीत हामरातुमरी

Next

वालूर ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाची तसेच सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या १७ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीला गावाच्या विकास कामांसाठी शासनाकडून दरवर्षी विविध स्वरुपात लाखो रुपये निधी प्राप्त होतो. यामुळे ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची झाली. सरपंच संजय साडेगावकर यांचे यावेळी १७ पैकी ११ सदस्य निवडून आल्याने त्यांचे ग्रामपंचायतीवरील वर्चस्व कायम राहिले.तर विरोधी गटाचे १७ पैकी सहा सदस्य निवडून आले. गुरुवारी ग्रामपंचायतीच्या सभागृहात नवनिर्वाचित सदस्यांच्या पहिल्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या पहिल्याच बैठकी दरम्यान सदस्य लिंबाजी रामराव कुपणवार,रामराव शामराव बोडखे यांच्यात प्रभागातील नळ योजनेवरुन वाद सुरू झाला. एकमेकांवर खुर्च्या फेकून मारहाणीपर्यंत प्रकरण गेले. दरम्यान लिंबाजी रामराव कुपणवार यांनी दिलेल्या तक्रारींवरून सरपंच संजय नारायणराव साडेगावकर व रामराव शामराव बोडखे यांच्या विरोधात मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.तर सरपंच संजय नारायणराव साडेगावकर यांनी आपल्याला मारहाण करून गळ्यातील दोन तोळे सोन्याची चेन हिसकावून घेतली असल्याची तक्रार केली. यावरुन लिंबाजी रामराव कुपणवार,सतीष गणपत कलाल,चंद्रकांत हनुमंतराव चौधरी व धारुजी त्र्यंबक धाबे या चौघांविरोधात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांनी वालूर येथे घटनास्थळी भेट दिली . ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचार दरम्यान एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप, किरकोळ वाद वगळता निवडणूक शांततेत पार पडली. निवडणुकीनंतर मात्र सदस्यांच्या पहिल्याच झालेल्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधक आमने- सामने आल्याने पहिली सभा चांगलीच गाजली.

Web Title: Hamratumari in the first meeting of the Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.